
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात स्वतःला ज्योतिष आणि आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणारा भोंदू बाबा अशोक खरातची सर्वाधिक चर्चा सुरु आहे. अशोक खरातच्या विरुद्ध आतापर्यंत ७ गुन्हे दाखल झाले आहेत. आता भोंदू बाबा अशोक खरात भाविकांची कशाप्रकारे फसवणूक करायचा याची माहिती समोर आली आहे. नागदेवता प्रसन्न होईल, पण हातातले तांदूळ सांडले तर तो तुम्हाला दंश करेल अशी भयंकर भीती दाखवून अशोक खरात भाविकांची आर्थिक लूट करायचा. अशोक खरातच्या भोंदूगिरीचा नाशिकमध्ये पर्दाफाश झाला आहे. रिमोट कंट्रोलवर चालणाऱ्या नकली सापाचा वापर करून रात्रीच्या अंधारात भाविकांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या अशोक खरातवर आता सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक खरातविरुद्ध राजेंद्र जासूदानी यांनी एक तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, अशोक खरात हा भाविकांना नाशिकमधील ईशान्येश्वर मंदिराच्या पाठीमागे रात्रीच्या वेळी घेऊन जात असे. तिथे अवतार पूजा करण्याचे नाटक करून तो भक्तांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण करायचा. मी आता पूजा करतोय, थोड्याच वेळात साक्षात नागदेवता प्रकट होईल. तुमच्या हातातील तांदूळ खाली पडू देऊ नका, अन्यथा नागदेव तुम्हाला चावेल, असे सांगून तो भक्तांना एकाच ठिकाणी खिळवून ठेवत असे.
यानंतर भक्त घाबरलेल्या अवस्थेत असताना खरात काही मंत्रांचे उच्चार केल्याचे सोंग करायचा. त्याचवेळी तो अंधारात रिमोट कंट्रोलवर चालणारा नकली साप समोर आणायचा. रात्रीचा गडद अंधार असल्यामुळे समोर सरपटणारा साप नकली आहे, हे भक्तांच्या लक्षात येत नसे. सापाची हालचाल पाहून घाबरलेले भक्त जागेवरून हलत नसत आणि खरात सांगेल त्याप्रमाणे वागत असत. ही भीती घालवून नागदेवतेला शांत करण्यासाठी खरात त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळायचा, अशी माहिती जासूदानी यांनी दिली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार राजेंद्र जासूदानी यांच्यावर गेल्या वर्षी अशोक खरातने स्वतःच खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, जासूदानी यांना खरातच्या वागणुकीवर संशय होता. त्यांनी खरातच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले. त्यानंतर आता अखेर जासूदानी यांनी खरात कशाप्रकारे फसवणूक करायचा, तो कशाप्रकारे लोकांना लुबाडण्याचे काम करायचा, याबद्दलची माहिती दिली आहे. जासूदानी यांनी या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना दिली आहे. आता या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे याचा तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत.