Aurangabad | जाता जाता पांडेजींचं मनपा कर्मचाऱ्यांना रिटर्न गिफ्ट, औरंगाबाद महापालिकेतील 211 कर्मचाऱ्यांची पदोन्नती

| Updated on: Jul 02, 2022 | 2:37 PM

मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाण्डेय ह्यांनी विविध प्रकारच्या पदोन्नत्या केल्या आहेत. यामध्ये सर्व संवर्गाच्या पदोन्नत्या केल्या आहेत.

Aurangabad | जाता जाता पांडेजींचं मनपा कर्मचाऱ्यांना रिटर्न गिफ्ट, औरंगाबाद महापालिकेतील 211 कर्मचाऱ्यांची पदोन्नती
Follow us on

औरंगाबाद : महापालिका (Aurangabad municipal corporation) आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांची बदली आता सिडकोच्या प्रमुख प्रशासक पदी झाली आहे. काही दिवसातच ते नवा पदभार स्वीकारतील. मात्र शुक्रवारी झालेल्या आस्थापना निवड समिती बैठकीत त्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. महापालिका प्रशासकांनी (Municipal Administrator) एकूण 211 मनपा कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. यामुळे विविध रिक्त पदे भरण्यात येतील. शुक्रवारी झालेल्या आस्थापना निवड समिती बैठकीमध्ये मनपामध्ये विविध पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या बाबतीत निर्णय घेण्यात आला आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच चतुर्थ श्रेणी मधील कर्मचाऱ्यांची तृतीय श्रेणीमध्ये पदोन्नती करण्यात आली आहे. यामध्ये उपअभियंता, सहाय्यक आयुक्त, कार्यालय आधिक्षक, लिपिक टंकलेखक लेखक, वरिष्ठ लिपिक, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, विस्तार अधिकारी या संवर्गामधील विविध रिक्त पदांवर कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. ही पदोन्नती करण्यास समितीने मान्यता दिली आहे. याबरोबरच या बैठकीत 12 वर्षे आणि 24 वर्षे आश्वासित प्रगती योजनेमधील पात्र कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. यामुळे मनपा मधील रिक्त पदे भरली जातील.

MSCIT पूर्ण केल्यानंतर अधिक लाभ

जे कर्मचारी पात्र आहेत त्यांची सहाय्यक आयुक्त आस्थापना विक्रम दराडे यांनी सिनिऑरिटी लीस्ट तयार केली. त्यानंतर त्यांना 5 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. नंतर त्यांची चाचणी घेण्यात आली. या चाचणीत जे पात्र ठरले, त्यांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. पदोन्नती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एम एस – सी आय टी, टायपिंग झालेले नाही, त्या कर्मचाऱ्यांना 1 वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. या कालावधीत एम एस – सी आय टी, टायपिंग पुर्ण केल्यानंतरच त्यांना पदाचा आर्थिक लाभ देण्यात येईल, अशी माहिती मनपा उपयुक्त संतोष टेंगळे यांनी दिली.

मनुष्यबळाची कमतरता दूर होणार?

मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाण्डेय ह्यांनी विविध प्रकारच्या पदोन्नत्या केल्या आहेत. यामध्ये सर्व संवर्गाच्या पदोन्नत्या केल्या आहेत. मनपा आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या कार्यकाळात सेवाभरती नियम बनला. आकृतीबंध अंतिम होऊन त्याला शासनाची मंजुरी देखील मिळाली. आकृतीबंध आणि सेवा भरती नियमाच्या आधी आणि नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदोन्नती करणारे आस्तिक कुमार पाण्डेय हे पहिले मनपा आयुक्त आहेत. या निर्णयामुळे सरळ सेवा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. मनपामध्ये मनुष्यबळाची जी कमतरता होती ती या निर्णयामुळे भरून निघेल. यामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा अधिक सुलभ होतील. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त बी बी नेमाने, उपायुक्त अपर्णा थेटे, शहर अभियंता सखाराम पानझडे, मुख्य लेखा परीक्षक डॉ. दे. का. हिवाळे, आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा उपस्थित होते.

किती कर्मचाऱ्यांना पदोन्नती?

शाखा अभियंता ते उप अभियंता – 18
कार्यालयीन अधीक्षक ते सहायक आयुक्त – 2
वरिष्ठ लिपिक ते अधीक्षक – 52
चतुर्थ श्रेणी ते लिपिक – 67
कनिष्ठ लिपिक ते वरिष्ठ – 71