मोठी बातमी! अंतरवालीकडे निघाले अन् वाटेतच… मोठा अनर्थ; मराठा आंदोलकाचा मृत्यू

मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी जालन्याच्या अंतरवली सराटीत आजपासून निर्णायक आंदोलन सुरू केले आहे. राज्यभरातून मराठा बांधव त्यांना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत. दरम्यान, बीडमधील सुग्रीव शिंदे या आंदोलकाचा अंतरवलीकडे जाताना हृदयविकाराच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. समाजाच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.

मोठी बातमी! अंतरवालीकडे निघाले अन् वाटेतच... मोठा अनर्थ; मराठा आंदोलकाचा मृत्यू
Maratha Protester Death
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 29, 2026 | 3:53 PM

मनोज जरांगे पाटील यांचं आजपासून जालन्याच्या अंतरवली सराटीत आंदोलन सुरू झालं आहे. मराठा सामाजाच्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी जरांगे यांनी आजपासून निर्णायक आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनासाठी त्यांनी राज्यातील प्रत्येक मराठा आंदोलकाला अंतरवलीत येण्याचं आवाहन जरंगे यांनी केलं आहे. त्यामुळे समाजातील लोक अंतरवलीकडे येत आहे. अंतरवलीकडे येत असतानाच एक दुर्देवी घटना घडली आहे. अंतरवलीत येत असताना एका व्यक्तीचा हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटी येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असलेल्या बीड जिल्ह्यातील एका आंदोलकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. सुग्रीव बापू शिंदे असे या आंदोलकाचे नाव असून ते केज तालुक्यातील नांदुर घाट येथील रहिवासी होते. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अंतरवाली सराटी येथे आजपासून उपोषण सुरू केले असून त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी सुग्रीव शिंदे हे आपल्या सहकाऱ्यांसह अंतरवालीकडे जात होते. गेवराई जवळ त्यांचे वाहन आले असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

राजुरीतून अंतरवलीकडे

दरम्यान, बीडच्या नवगण राजुरी येथून साहित्य घेऊन संपूर्ण तयारीनिशी मोठ्या संख्येने मराठा बांधव अंतरवलीकडे रवाना झाले आहेत. मुंबईला जाण्याची देखील तयारी असल्याचे मराठा बांधवांकडून सांगितले जात आहे. जरांगे पाटलांचे आंदोलन जोपर्यंत सुरू आहे, तोपर्यंत तिथेच थांबण्याची तयारी असल्याची माहिती या आंदोलकांनी दिली आहे.

धाराशिवमधून थेट रिक्षाने

जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातून मोठ्या संख्येने रिक्षा आणि ट्रॅक्टर घेऊन मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे निघाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे, यासाठीच आम्ही अंतरवलीत जात आहोत, असं आंदोलकांनी म्हटलं आहे.

सिल्लोडमध्ये रास्ता रोको

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात छत्रपती संभाजीनगरमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला. आंदोलकांनी छत्रपती संभाजीनगर – जळगाव महामार्गावर वाहने अडवली. आंदोलकांनी या परिसरात बेमुदत रास्ता रोकोचे बॅनर लावले आहे.

Follow Us