Weather Update | औरंगाबादेत सलग तीन दिवस 42 अंश तापमान, 2019 नंतर सर्वात उष्ण दिवस, मराठवाड्यात कसे राहिल तापमान?

| Updated on: May 01, 2022 | 11:34 AM

सध्या राज्यातील तापमान वाढल्यामुळे बाष्पयुक्त वारेही वेगाने वाहत आहेत. त्यामुळे बाष्प, थंड आणि उष्ण वाऱ्यांचा आकाशात संगम होऊन ढगांचे अच्छादन तयार होऊ शकते. अशाच वातावरणामुळे कोल्हापूरसह या भागातील इतर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आली आहे.

Weather Update | औरंगाबादेत सलग तीन दिवस 42 अंश तापमान, 2019 नंतर सर्वात उष्ण दिवस, मराठवाड्यात कसे राहिल तापमान?
Follow us on

औरंगाबादः राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे (Heat Wave) मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर अनुभवायला मिळत आहे. औरंगाबाद शहरात (Aurangabad city) मागील तीन दिवसांपासून 42 अंश सेल्सियस एवढ्या उच्चांकी तापमानाची  (Temperature)नोंद झाली आहे. मागील दोन वर्षात प्रथमच शहराचा पारा 42.1 ते 42.4 अंशांवर पोहोचल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेनं घेतली आहे. विशेष म्हणजे कडक उन्हासोबत मराठवाड्याच्या काही भागात ढगाळ हवामान आणि पावसाच्या हलक्या सरीही बरसत आहेत. येत्या काही दिवसात मराठवाड्यातील तापमानात असाच चढ-उतार पहायला मिळेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

दुपार काढणं नागरिकांना कठीण

औरंगाबादचं तापमान मागील आठवडाभरापासून वाढतच असून 27 एप्रिल रोजी प्रथमच शहराचा पारा 42.1 पर्यंत पोहोचला. तसेच मागील दोन दिवस तापमान 42.4 अंशांपर्यंत नोंदवले गेले. शहराचं तापमान 2019 मध्ये 43 अंशांवर पोहोचले होते. त्यानंतर 2020 आणि 2021 मध्ये तापमान सलग तीन दिवस 42 अंशांवर कधीच पोहोचले नव्हते. त्याआधीही 2016 ते 2018 मध्ये शहराचं तापमान 42 अंशांवर पोहोचलं नव्हतं. त्यामुळे मागील तीन वर्षांत प्रथमच औरंगाबाद एवढं तापलेलं दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना दुपारची वेळ घालवणं अत्यंत कठीण जात आहे. संध्याकाळी साडेसात वाजेनंतर वातावरण काहीसं शांत होतं. त्यात दुपारी ज्या भागात वीजपुरवठा खंडित होतोय, त्या ठिकाणच्या नागरिक उकाड्याने हैराण होत आहेत.

मराठवाड्यात इतर जिल्ह्यात काय स्थिती?

औरंगाबाद- 42 अंश सेल्सियस (कमाल)
नांदेड- 43 अंश सेल्सियस (कमाल)
उस्मानाबाद- 42 अंश सेल्सियस (कमाल)
परभणी- 44 अंश सेल्सियस (कमाल)

तापमानात चढ-उतार राहणार

सध्या राज्यातील तापमान वाढल्यामुळे बाष्पयुक्त वारेही वेगाने वाहत आहेत. त्यामुळे बाष्प, थंड आणि उष्ण वाऱ्यांचा आकाशात संगम होऊन ढगांचे अच्छादन तयार होऊ शकते. अशाच वातावरणामुळे कोल्हापूरसह या भागातील इतर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आली आहे. उर्वरीत शहरांवर ढगाचे अच्छादन तयार होऊ शकते. त्यामुळे तापमानात चढ-उतार दिसून येईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, महाबळेश्वर, रत्नागिरी, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी काल हलका ते जोरदार पाऊस पडला.