औरंगाबादः महापालिकेच्या गुंठेवारी विभागाचा प्रमुख तथा शाखा अभियंता संजय चामले (Sanjay Chamle) याला लाचलुचपत खात्याच्या पथकाने शुक्रवारी पकडल्यानंतर त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. एसीबीच्या पथकाने (ACB team) केलेल्या या कारवाईत चामले याच्या घरी तब्बल 43 तोळे सोनं, 3.5 किलो चांदी, 3 लाख 78 हजार रुपये रोकड मिळाली. तसेच काही प्रॉपर्टीची कागदपत्रही आढळली. चामलेकडे आणखी किती घबाड मिळू शकते, याची चाचपणी एसीबीकडून करण्यात येत आहे. लेआऊट मंजूर करण्यासाठी तीन लाख रुपयांची लाच (Bribe) घेताना चामले याला घरातच पकडण्यात आले होते. शुक्रवारी पकडल्यानंतर शनिवारी संध्याकाळपर्यंत त्याच्या घराची झाडाझडती घेणं सुरु होतं. चामलेच्या घरी एवढं मोठं घबाड सापडल्यानंतर याच्यावर कुणाचा तरी वरदहस्त नक्की आहे, असा संशय एसीबीला आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचं आव्हान एसीबीसमोर आहे.