भाजपच्या कार्यकर्त्यांनी येथे शिंपडलं गोमुत्र; भाषण केलेल्या स्टेजचेही केले शुद्धीकरण

| Updated on: Apr 03, 2023 | 5:03 PM

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत शिवसेनेची सभा झाली. त्यामुळे हे मैदान अपवित्र झालं. असं भाजप पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी हे मैदान आज गोमुत्र शिंपडत शुद्ध केलं.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी येथे शिंपडलं गोमुत्र; भाषण केलेल्या स्टेजचेही केले शुद्धीकरण
Follow us on

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीची जिथं सभा झाली तिथं भाजप कार्यकर्त्यांनी गोमुत्र शिंपडलं आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये महाविकास आघाडीचे काल सभा झाली. आज भाजपचे कार्यकर्ते सभास्थळी आले. त्यांनी गोमुत्र शिंपडलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणांनी हे मैदान पवित्र झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पूर्णपणे गाडली पाहिजे, अशी बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण होती. परंतु, याच मैदानात उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत घेऊन सभा घेतली. त्यामुळे हे मैदान अपवित्र झालं आहे. असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

अपवित्र पाय लागले

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कुबड्या घेऊन सभा घेतली. याचा भाजपचे पदाधिकारी निषेध करत आहेत. संभाजीनगरमधील जे मैदान त्यांनी पवित्र केले आहे. ज्यांचे अपवित्र पाय येथे लागले आहेत. ते शुद्ध करण्याचं काम आम्ही करत असल्याचं भाजपचे पदाधिकारी यांनी सांगितलं.

कालच्या सभेने मैदान अपवित्र

१९८८ साली हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी येथून हिंदुत्वाची गर्जना दिली होती. या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर राहील, असं सांगितलं होतं. काल याठिकाणी वज्रमूठ सभेच्या माध्यमातून हे मैदान अपवित्र झालंय.

बाळासाहेबांनी २४ वर्षे दिला लढा

बाळासाहेब ठाकरे यांनी २४ वर्षे काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी लढा दिला. हिंदुत्वाचा प्रवास थांबवणाऱ्या लोकांसोबत काल येथे सभा झाली. हे ग्राऊंड गोमुत्र शिंपडून पवित्र करत आहोत. छत्रपती संभाजीनगर हे नाव आम्ही पुढं नेणार आहोत, असं भाजपचे पदाधिकारी यावेळी म्हणाले.

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत शिवसेनेची सभा झाली. त्यामुळे हे मैदान अपवित्र झालं. असं भाजप पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी हे मैदान आज गोमुत्र शिंपडत शुद्ध केलं. यावरून राजकारण केलं जात असल्याची चर्चा आता सुरू झाली. महाविकास आघाडीने सभा घेतली. यावरून मैदान कधी अपवित्र होते का, असा सवाल नागरिक विचारत आहेत. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला पवित्र, अपवित्र शोभते का, असाही प्रश्न काही सुज्ञ नागरिक विचारत आहेत.