मला ठार मारण्याचा कट; मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक दावा; माजी मुख्यमंत्र्यांचा…
मनोज जरांगे पाटील यांनी दोन खळबळजनक दावे केले आहेत: "मला ठार मारण्याचा कट रचला जात आहे, माझ्याकडे याचे पुरावे आहेत," असा दावा त्यांनी केला आहे. तसेच, ५०० कोटी घेतल्याचा आरोप करून माझी बदनामी केली जात आहे; एकनाथ शिंदेंनी दिल्लीत भाजप नेत्यांना हे सांगितल्याचा दावाही त्यांनी केला. सरकारच्या मराठा आरक्षण धोरणांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

मनोज जरांगे पाटील यांनी आज दोन मोठे खळबळजनक दावे केले आहेत. मला ठार मारण्याचा कट होता. माझ्याकडे त्याचा पुरावा आहे, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तसेच, मनोज जरांगे पाटील यांना 500 कोटी रुपये दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील भाजपच्या नेत्यांना सांगितलं होतं. मला 500 कोटी रुपये दिल्याचं सांगून माझी बदनामी केली जात आहे, असा दावाही जरांगे यांनी केला आहे. बीड येथील नारायण गडावरील दसरा मेळाव्यातून जरांगे पाटील यांनी हा दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
तुमच्या पायाखालची माती सरकेल असा माझ्याकडे पुरावा आहे. एक गुप्त चर्चा माझ्याकडे आली आहे. जरांगेंना कसं मारायचं, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी झाली होती. त्यात एका माजी मुख्यमंत्र्यांचं नाव आहे. हा माजी मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे आमचा बाप आहे असं म्हणायचा. त्यात एक भयान कमेंट आहे. त्या नेत्याने ऐकल्यावर उद्याच पक्ष सोडेल इतकी ही भयान कमेंट आहे. 30 ते 40 मिनिटाची ही चर्चा आहे. तुम्ही ऐकल्यावर तुम्हीही म्हणाल या लोकांनी जरांगेंना किती त्रास दिला, असं मनोज जरांगे म्हणाले.
भाजप कुणाचा गेम करतंय?
एकनाथ शिंदेंनी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतले. ते श्रीकांत शिंदेंना दिले आणि त्यांना मला दिले, असं ते म्हणत आहेत. तशी चर्चा माझ्या कानावर आली आहे. भाजपमध्ये ही चर्चा सुरूआहे. जर मला हे पैसे मिळाले असते तर मी ते दुष्काळात तुम्हाला वाटले असते ना? मला या आरोपाचा छडा लावायचा आहे. कोण कुणाचा गेम करतंय हे मला पाहायचं आहे. शिंदेंनी हे पैसे घेतले असेल तर त्यांनी सांगावं. नसेल घेतले तर भाजप असं का वागतोय? भाजपला मला संपवायचं आहे की एकनाथ शिंदेंना संपवायचं आहे? याच्या मुळाशी जायचं आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मंत्रिमंडळाची बैठक माझ्या विरोधात
सरकार आपल्या विरोधात कॅबिनेटच्या बैठका घेत आहेत. परवाच्या दिवशी माझ्या विरोधात कॅबिनेट झाली. मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक झाली. त्यात मराठा आणि कुणबी एकच आहे, मराठ्यांना आरक्षण देण्याची चर्चा झाली पाहिजे होती. पण, ती चर्चाच झाली नाही. आपल्याच समाजातील नेत्यांनी जे देता येतं तेच द्या. जे देता येत नाही ते डायरेक्ट नाही म्हणून सांगा, असं बैठकीत सांगितलं. असं जर झालं तर उद्या ते कशालाही नाही म्हणतील. एसीबीसी आणि कुणबी प्रमाणपत्रालाही नाही म्हणतील. शेतकऱ्यांनाही मदत देऊ नका म्हणतील, असा हल्लाच जरांगे यांनी चढवला.