रजोनिवृत्ती आणि पीसीओडीवरील राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे मेघना साकोरे बोर्डीकरांच्या हस्ते उद्घाटन

राज्यस्तरीय रजोनिवृत्ती आणि पीसीओडी प्रशिक्षण कार्यशाळा मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते सुरू झाली. या कार्यशाळेत बदलती जीवनशैली, आहार आणि तणावामुळे वाढलेल्या पीसीओडीचे निदान व व्यवस्थापनावर भर दिला जात आहे. मराठवाड्यातील आरोग्य कर्मचारी, डॉक्टरांना आधुनिक उपचारपद्धती, समुपदेशन आणि निरोगी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन मिळत आहे, ज्यामुळे महिलांच्या आरोग्य सेवांची गुणवत्ता वाढेल.

रजोनिवृत्ती आणि पीसीओडीवरील राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे मेघना साकोरे बोर्डीकरांच्या हस्ते उद्घाटन
Meghna Bordikar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 30, 2026 | 11:04 PM

महिलांच्या आरोग्याशी संबंधित रजोनिवृत्ती (Menopause) आणि पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (PCOD/PCOS) विषयक आरोग्यसेवा अधिक सक्षम व परिणामकारक करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन गुरुवारी महात्मा गांधी मिशन (एम.जी.एम.) वैद्यकीय महाविद्यालयाच्या दयान हॉल येथे राज्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक डॉ. आशीष भारती, डॉ. कांचन वानोरे, डॉ. आशिष भारती, डॉ. दयानंद मोतीपवळे, डॉ. प्रशांत हिंगणकर (युनिसेफ), डॉ. मंगेश गढरी (युनिसेफ), डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. संतोष कडले, डॉ. सुरेश रावते, डॉ. विनायक खेडकर, डॉ. अभय धानोरकर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी, तज्ज्ञ आणि मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

आरोग्य उपसंचालक, छत्रपती संभाजीनगर आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत मराठवाडा विभागातील स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.

कार्यशाळेत रजोनिवृत्ती व्यवस्थापन, पीसीओडीचे निदान व उपचार, समुपदेशन, आरोग्यदायी जीवनशैली, मानसिक व शारीरिक आरोग्य, आधुनिक उपचारपद्धती आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच चर्चासत्र आणि प्रश्नोत्तर सत्राच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ज्ञान व कौशल्यात भर घालण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

यावेळी तज्ज्ञांनी सांगितले की, बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि वाढता ताण यामुळे पीसीओएसचे प्रमाण वाढत असून वेळेत निदान, योग्य समुपदेशन आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब केल्यास हा विकार प्रभावीपणे नियंत्रणात ठेवता येऊ शकतो.

महिलांच्या आरोग्यविषयक सेवांची गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी आणि रजोनिवृत्ती तसेच पीसीओडीग्रस्त महिलांना दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us