औरंगबाद जिल्ह्याला मिळणार सहा डायलिसिस युनिट, गरजू रुग्णांची सोय, घाटी रुग्णालयावरील ताण कमी होणार

| Updated on: Oct 28, 2021 | 10:48 AM

खाजगी दवाखान्यात यासाठी पाच हजारांपर्यंत खर्च लागतो. सध्या किडनीच्या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालय आणि वैजापूरमध्ये हे युनिट सुरू झाल्यास घाटीतला ताण कमी होण्यास मदत होईल.

औरंगबाद जिल्ह्याला मिळणार सहा डायलिसिस युनिट, गरजू रुग्णांची सोय, घाटी रुग्णालयावरील ताण कमी होणार
औरंगाबाद जिल्ह्यात आणखी सहा डायलिसिस युनिट येणार
Follow us on

औरंगाबादः जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये आतापर्यंत फक्त घाटी रुग्णालयात (Ghati hospital) डायलिसिसचे युनिट उपलब्ध आहे. मात्र आता औरंगाबाद जिल्ह्याला आणखी सहा असे युनिट मिळणार आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्रात 35 डायलिसिस युनिट खरेदीसाठी 9 कोटी 91 लाख रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. यातून औरंगाबादच्या चिकलठाणा येथील जिल्हा रुग्णालयासाठी (मिनी घाटी) चार, तर वैजापूरच्या ग्रामीण रुग्णालयासाठी दोन डायलिसिसचे युनिट बसवण्यात येणार आहेत. आतापर्यंत फक्त घाटी या शासकीय रुग्णालयातच ही सुविधा होती. जिल्ह्यात डायलिसिसचे आणखी सहा युनिट वाढणार असल्याने शहरी व ग्रामीण रुग्णांना अत्यंत माफक दरात या उपचाराची सोय होणार आहे.

जिल्ह्यासाठी 84 लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर

किडनी विकाराग्रस्त रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशा रुग्णांना आठवड्यातून दोन वेळा डायलिसिस करावे लागते. एका वेळचे शुल्क 2500 हजारांपासून सुरु होते. शहरात मशीन्स कमी असल्याने वेगवेगळ्या वेळेत रुग्णांना बोलवावे लागते. आता युनिट वाढल्यास त्याचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांना होईल, अशी प्रतिक्रिया किडनी स्पेशलिस्ट डॉ. आदित्य येळीकर यांनी व्यक्त केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले की, जिल्हा रुग्णालयात डायलिसिससाठी 1 कोटी 42 लाखांचा प्रस्ताव 2017 मध्येच पाठवला आहे. त्यामध्ये आरओ प्लँट तसेच इतर साहित्य आहे. हा प्रस्ताव चार वर्षांनी परत आला होता. त्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील विचारणा केली होती. त्यानंतर पुन्हा 84 लाखांचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. आता त्याला मंजुरी मिळाली आहे. वैजापूरच्या रुग्णालयासाठीही आरओ युनिटही मंजूर झाले आहेत.

खाजगी रुग्णालयात एकवेळचा खर्च 5000 रुपयांपर्यंत

घाटीच्या सुपरस्पेशालिटीचे विशेष कार्याधिकारी डॉ. सुधीर चौधरी यांनी सांगितले की, घाटीत केवळ रजिस्ट्रेशन फी वीस रुपये घेतली जाते. खाजगी दवाखान्यात यासाठी पाच हजारांपर्यंत खर्च लागतो. सध्या किडनीच्या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालय आणि वैजापूरमध्ये हे युनिट सुरू झाल्यास घाटीतला ताण कमी होण्यास मदत होईल.

जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाने मृत्यू नाही

औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे 17 रुग्ण (शहर 10, ग्रामीण 7 ) आढळले. तसेच सलग दुसऱ्या दिवशी एकही मृत्यू झाला नाही. दिवसभरात 14 जणांना (शहर 7, ग्रामीण 7) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 1,45, 385 रुग्ण बरे झाले. एकूण रुग्णांची संख्या 1,49,119 झाली असून 3,608 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 126 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

इतर बातम्या-

जालनाः जाफराबादेत 9 चोरट्यांचा धुमाकूळ, घरात घुसून मुली व महिलांना मारहाण, दीड लाखांचे दागिने व मुद्देमाल पळवला

चार दिवस उसात लपून बसला, मुंबईला जाताच मुसक्या आवळल्या, तोंडोळी बलात्कार प्रकरणी सहावा आरोपी जेरबंद