Weather Alert: काळेकुट्ट ढग अजूनही हटेनात, दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

| Updated on: Oct 09, 2021 | 6:41 PM

येत्या दोन दिवसात पुणे, नाशिक, अहमदनगर, धुळे, सातारा, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, परभणी आणि नांदेड या दहा जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची नोंद झाली आहे. त्यामुळे येत्या काही तासात येथे मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे. 

Weather Alert: काळेकुट्ट ढग अजूनही हटेनात, दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

औरंगाबाद: मराठवाड्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाचं (Return Mansoon) चांगलंच थैमान माजलं आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद (Aurangabad), उस्मनाबाद, बीड, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांवर अजूनही पावसाचे ढग असून पुढील दोन दिवसात येथे वादळी वाऱ्यासह पाऊस (Thunderstorm) प़डण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

औरंगाबाद परिसरात दिवसभर रिपरिप

औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात तुरळक ठिकाणी सकाळी अगदी काही मिनिटेच सूर्यदर्शन झाले. मात्र त्यानंतर सतत काही अंतराने पावसाची रिपरिप सुरु आहे. ग्रामीण भागात वीजांच्या कडकडाटासहित पाऊस सुरु आहे. मागील आठवड्यात दिवसभराचे चित्र पाहता, दुपारपर्यंत आकाश निरभ्र असे. मात्र संध्याकाळी पावसाला सुरुवात होत असे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सकाळपासूनच आकाशात काळे ढग जमा होत असून वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात सुरु झालेल्या परतीच्या पावसाने ग्रामीण भागातील शेतकरी मात्र आता कधी एकदा हा पाऊस थांबतोय, याकडेच डोळे लावून बसला आहे.

कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

येत्या दोन दिवसात पुणे, नाशिक, अहमदनगर, धुळे, सातारा, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, परभणी आणि नांदेड या दहा जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानाची नोंद झाली आहे. त्यामुळे येत्या काही तासात येथे मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे.

मराठवाड्यात काय स्थिती?

दिनांक 9 ऑक्टोबर रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाटासह पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग अधिक (तशी 30 ते 40 किलोमीटर) राहून मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दिनांक 10 ऑक्टोबर रोजी बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (तशी 30 ते 40 किलोमीटर) राहून पावसाची शक्यता आहे.

16  आणि 17 ऑक्टोबरला जवाद वादळ धडकणार

प्रसिद्ध हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या केरळ किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्याची दिशा पूर्वेकडे बंगालच्या उपसागराकडे सरकत आहे. पुढील पाच सहा दिवसात या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर चक्रीवादळात झाले की याचे ‘जवाद’ असे नामकरण होईल. साधारण चौदा पंधरा तारखेला हे ‘जवाद’ चक्रीवादळ निर्माण होणार आहे . व पुढे 16 ऑक्टोबर ला जवाद हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार आहे. यावेळी या चक्रीवादळाची तीव्रता वाढलेली असण्याची शक्यता असल्याने आंध्र प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड, महाराष्टारील विदर्भ व पूर्व मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर व परभणी या जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावणार आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात 16 आणि 17 ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पुन्हा एकदा पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.

 इतर बातम्या- 

Weather: मान्सूनची लवकरच माघार, पण जवाद चक्रीवादळ धडकणार, कोणत्या जिल्ह्यांना फटका?

पुणे साताऱ्यात मुसळधार, तळकोकणात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता