“व्हॅलेन्टाईन डेनिमित्त आम्हाला उद्धव ठाकरे हे ‘मातोश्री’वरचे पुन्हा हवेत”, बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Feb 14, 2023 | 11:44 PM

व्हॅलेन्टाईन डे'च्या निमित्ताने पत्रकारांनी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना 'व्हॅलेन्टाईन डे'च्या काय शुभेच्छा द्याल? असा प्रश्न विचारला.

व्हॅलेन्टाईन डेनिमित्त आम्हाला उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरचे पुन्हा हवेत, बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
Follow us on

अमरावती : जगभरात आज ‘व्हॅलेन्टाईन डे’ (Valentine Day) साजरा करण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात दर महिन्यात 7 ते 14 या तारखेदरम्यान ‘व्हॅलेन्टाईन’ आठवडा साजरा करण्यात येतो. या आठवड्याची जगभरात विशेष क्रेझ असते. यावर्षीदेखील या आठवड्याची क्रेझ होती. अखेर आज ‘व्हॅलेन्टाईन डे’ हा या आठवड्याचा शेवटचा दिवस होता. या ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या निमित्ताने पत्रकारांनी आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या काय शुभेच्छा द्याल? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी आपलं उद्धव ठाकरे यांच्याशी कोणतंही शत्रूत्व नसल्याचं विधान केलं.

“व्हॅलेन्टाईन डे हा आमच्या विषय नाहीय. आम्हाला ‘मातोश्री’वरचे उद्धव ठाकरे हवेच आहेत. ‘वर्षा’वर त्यांना ते कठीण गेलं. त्यामुळे हा सगळा अडचणीचा विषय झाला. आमचं काही वैयक्तिक शत्रूत्व नाहीय. त्यामुळे उद्धव ठाकरे ‘मातोश्री’वर मजबूत दिसतात. तिथून ते अधिक मजबूत व्हावेत, अशा शुभेच्छा”, असं बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडू नाराज?

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या आठ महिन्यांमध्ये काय-काय घडामोडी घडल्या हे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाने पाहिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांना घेऊन शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. त्यानंतर भाजपसोबत हातमिळवणी करुन महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणलं.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे या आमदारांमध्ये प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांचादेखील समावेश असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. बच्चू कडू महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. तरीही त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकार विरोधात जात शिंदेंच्या बंडाला पाठिंबा दिला.

आता शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन आठ महिने होत आली आहेत. पण तरीही राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार पार पडलेला नाही. त्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये धुसफूस असल्याची चर्चा वारंवार समोर येते. या दरम्यान बच्चू कडू यांचं उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आलेलं विधान महत्त्वाचं मानलं जात आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर बच्चू कडू यांना दिव्यांग विभागाचं मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. पण मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी आपली नाराजी अनेकदा स्पष्टपणे व्यक्तही केलीय.

याआधी बच्चू कडू यांची उद्धव ठाकरेंवर टीका

बच्चू कडू यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त केला असला तरी याआधी त्यांनी टीका देखील केलीय. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर बच्चू कडू यांनी थेट उद्धव ठाकरेंवर अनेकदा निशाणा साधला होता. त्यानंतर आज त्यांनी उद्धव ठाकरे ‘मातोश्री’वर मजबूत दिसतात, असं वक्तव्य केलंय.