बीडमधील सतीश उर्फ खोक्या भोसलेची निर्दोष सुटका, वर्षभरानंतर बाहेर येताच म्हणाला एका मोठ्या नेत्यासाठी…

बीडमधील बहुचर्चित सतीश उर्फ खोक्या भोसले याची मारहाण प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली असून, वर्षभरानंतर तो कारागृहातून बाहेर आला आहे.

बीडमधील सतीश उर्फ खोक्या भोसलेची निर्दोष सुटका, वर्षभरानंतर बाहेर येताच म्हणाला एका मोठ्या नेत्यासाठी...
Satish Khokya Bhosale
| Updated on: Apr 03, 2026 | 9:50 AM

शिरूर कासार तालुक्यातील बहुचर्चित ढाकणे पिता-पुत्र मारहाण प्रकरणात सतीश उर्फ खोक्या भोसले याला बीड न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. पुराव्याअभावी या प्रकरणातून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तब्बल एक वर्षानंतर तो छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहातून बाहेर आला आहे. त्यामुळे त्याच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नेमके प्रकरण काय?

आमदार सुरेश धस यांचा खंदा कार्यकर्ता म्हणून सतीश भोसले याची ओळख आहे. गेल्या वर्षी एका व्यक्तीला बॅटने अमानुषपणे मारहाण करतानाचा त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर शिरूर कासार पोलीस ठाण्यात त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. याच दरम्यान ढाकणे पिता-पुत्राला मारहाण केल्याचा आरोपही त्याच्यावर झाला होता. ज्यामध्ये त्याला अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

न्यायालयाचा निकाल काय?

ढाकणे पिता-पुत्र मारहाण प्रकरणाची सुनावणी बीड न्यायालयात पार पडली. योग्य पुराव्याअभावी न्यायालयाने सतीश भोसले याला आरोपातून निर्दोष मुक्त केले. बॅटने मारहाण करण्याचे मुख्य प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ आहे. मात्र त्यासह इतर गुन्ह्यांमध्येही त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. यामुळे त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. काल सायंकाळी तो जेलबाहेर आला.

सतीश भोसलेची आक्रमक प्रतिक्रिया

कारागृहातून बाहेर पडताच सतीश भोसलेने माध्यमांशी बोलताना आपली खंत व्यक्त केली. आज न्याय देवतेने मला न्याय दिला असून अखेर सत्याचा विजय झाला आहे. मात्र, गेल्या एका वर्षात माझं सगळं काही उद्ध्वस्त झालं. एका मोठ्या नेत्याला राजकीयदृष्ट्या टार्गेट करण्यासाठी माझ्यासारख्या आदिवासी समाजातील तरुणाचा बळी दिला गेला. माझ्या कुटुंबावर तीन वेळा हल्ले झाले, पण प्रशासनाने त्याची साधी दखलही घेतली नाही. आयुष्यभराच्या कमाईतून उभारलेलं माझं घरही पाडलं गेलं, असे सतीश भोसले म्हणाला.

जिल्ह्यातील राजकारणावर टीका

यावेळी सतीश भोसलेने  जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या राजकीय स्थितीवरही बोट ठेवले. आमच्या जिल्ह्यात काही मोजके लोक राजकारणात जातीयवादाचे विष कालवण्याचे काम करत आहेत. बॅटने मारहाण केल्याच्या व्हायरल व्हिडीओचे सत्यही लवकरच समोर येईल. न्याय देवता त्या प्रकरणात जो काही निर्णय देईल, तो मला मान्य असेल, असा विश्वासही त्याने यावेळी व्यक्त केला.

Follow Us