
बीडः राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची निवड झाल्यानंतर चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे पद रिक्तच आहे. महिला प्रदेशाध्यक्ष पदासाठी मुंबईत एक बैठक देखील नुकतीच पार पडली आहे. या बैठकीत अनेकांनी इच्छुक असल्याचा दावा केलाय तर ओबीसी चेहरा म्हणून बीडच्या रेखा फड (Rekha Fad) यांचं नाव आघाडीवर आहे. रेखा फड या पूर्वी मनसेत बीड महिला जिल्हा प्रमुखपदी कार्यरत होत्या. मागील दहा वर्षांपासून त्या राष्ट्रवादीत (NCP) कार्यरत आहेत. महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चाकणकर यांच्याकडे पाच-सहा महिन्यांपूर्वी महिला आयोगाचे अध्यक्षपद सोपवण्यात आले. त्यानंतर त्यांनी एका पदाचा राजीनामा मागील महिन्यात दिला. त्यांच्या जागी नव्या प्रदेशाध्यक्षांची नेमणूक लगेच केली जाणार होती. मात्र अद्याप या पदावर कुणाचीही नेमणूक करण्यात आलेली नाही. पुढील काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे बोलले जात आहे.
राज्यात महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि विविध नागरपरिषदांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे राजकारण तापले आहे. अशातच राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यक्ष अद्याप रिक्तच आहे. पद भरण्यासाठी वरिष्ठ पातळीवर घडामोडीला वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची नुकतीच बैठक पार पडली आहे. या बैठकीला राज्यातून महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी अनेक जण इच्छुक असल्याचे समोर आले. बऱ्याच महिला पदाधिकाऱ्यांनी विधानपरिषद सदस्य होण्यासाठी रुची दाखविली असल्याचे सूत्रांनी सांगितले. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा चेहरा ओबीसी प्रवर्गातुन देण्याचा राष्ट्रवादीचा विचार सुरू आहे. त्यामुळे बीडच्या रेखा फड यांचं नाव आघाडीवर असल्याचे समजते.
बीडमधील आघाडीवरील महिला कार्यकर्त्या रेखा फड या पूर्वी मनसेत होत्या. मनसेच्या महिला जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. मागील दहा वर्षांपासून त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अॅक्टिव्ह आहेत. त्यांनी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष पददेखील भूषवले आहे. लक्षवेधी आंदोलनामुळे त्यांची अनेकदा राज्यात चर्चाही झाली आहे. त्यांनी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष पदावर असताना त्यांनी चोख भूमिका बजावली आहे. महिला कार्यकर्त्यांचे मोठे संघटन हा त्यांचा प्लस पॉइंट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या अनेक निषेध आंदोलनांमध्ये त्यांनी आक्रमक भूमिकाही घेतली आहे.