
भंडारा जिल्ह्यातील खळबळजनक १० दिवसांच्या बाळ विक्री प्रकरणात आता एक धक्कादायक ट्वीस्ट आला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. नितेश वाजपेयी याने पोलिसांच्या अटकेच्या भीतीने स्वतःवर ब्लेडने वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या या डॉक्टरवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी या टोळीतील आणखी एका आरोपीची ओळख पटवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी भंडारा जिल्हा बाल विकास विभागाच्या तक्रारीवरून वरठी पोलीस ठाण्यात बाळ विक्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून मुख्य आरोपी डॉ. नितेश वाजपेयी आणि त्याचे तीन साथीदार पोलिसांना गुंगारा देत होते. पोलीस त्यांच्या मागावर असताना आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास डॉक्टरने बालाघाट-कटनी मार्गे स्वतःच्या खाजगी कारने भंडाऱ्याकडे येण्याचा बेत आखला.
गोबरवाही परिसरातील रस्त्यावर पोहोचल्यावर डॉक्टरने लघुशंकेचे कारण सांगून चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. गाडीतून खाली उतरताच त्याने खिशातून ब्लेड काढून स्वतःच्या पोटावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या डॉक्टरला पाहून चालकाची घाबरगुंडी उडाली. त्याने तातडीने डॉक्टरला तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्याला भंडाऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या तो पोलीस निगराणीखाली उपचार घेत आहे.
या गुन्ह्याचा तपासादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येताना दिसत आहेत. पोलिसांनी या रॅकेटमध्ये आता सहाव्या आरोपीचे नाव निष्पन्न केले आहे. यावेळी पोलिसांनी लल्लेश्वरी सादेपाच आणि सागर सिक्का (रा. गोंदिया) या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर मालती प्रकाश वाघमारे, पौर्णिमा सतीश धुर्वे आणि उमेशसिंग रामचंद्र सिंग गहलोत (रा. गोंदिया) यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
दरम्यान केवळ दहा दिवसांच्या निष्पाप बाळाचा सौदा करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट आहे. एका सुशिक्षित डॉक्टरने अशा प्रकारे गुन्हेगारी पाऊल उचलल्याने वैद्यकीय क्षेत्रातही चर्चा सुरू आहे. या टोळीने आतापर्यंत नेमकी किती बालकांची विक्री केली आहे? या रॅकेटचे जाळे आंतरराज्यीय स्तरावर पसरले आहे का? आणि यात आणखी कोणते मोठे मासे अडकणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.