मनोज जरांगेंची परदेशात संपत्ती? 500 कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणात मोठा ट्विस्ट, पाटलांच्या जुन्या सहकाऱ्याने आता थेट…,
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये एक ऑडिओ क्लिप ऐकवली होती. या ऑडिओ क्लिपमुळे मोठी खळबळ उडाली. दरम्यान आता या प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक ऑडिओ क्लिप ऐकवली होती. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांनी देण्यासाठी भाजपकडून 500 कोटी रुपये घेतले, हे पैसै त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत जरांगे पाटील यांना दिले, असं म्हटलं होतं. या ऑडिओ क्लिपमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा एकनाथ शिंदे यांनी खुलासा करावा, अशी मागणी देखील मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. दरम्यान यावरून आता वातावरण चांगलंच तापलं आहे. या ऑ़डिओ क्लिपनंतर महायुतीमध्येच जुंपल्याचं पहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
एकीकडे हे सर्व सुरू असतानाच आता मनोज जरांगे पाटील यांचे जुने सहकारी असलेल्या अमोल खुणे यांनी या ऑडिओ क्लिपबद्दल आणि मनोज जरांगे पाटील तसेच त्यांचे सहकारी असलेल्या गंगाधर काळकुटे यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. जरांगे पाटलांसह गंगाधर काळकुटेंचे परदेश कनेक्शन आहे. त्यामुळे या सर्वांची चौकशी करा अशी थेट मागणी आता अमोल खुणे यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटलांनी ऐकवलेली ऑडिओ क्लिप 2024 पासून माझ्यासह जरांगेंकडे होती. शिंदे साहेबांनी सांगितले 500 कोटी घेतले नाहीत आणि दिले पण नाहीत मग सत्य काय आहे ते समोर आणावं. अंतरवाली ते मुंबई पर्यंत यांनी बॅनर लावले, मग एवढा पैसा त्यांच्याकडे कुठून आला? मनोज जरांगे आणि गंगाधर काळकुटे यांचं परदेश कनेक्शन 100 टक्के आहे. गंगाधर काळकुटेंसह सगळ्यांची चौकशी करावी यांच्या परदेशातही प्रॉपर्ट्या निघतील, असा दावा अमोल खुणे यांनी केला आहे. दरम्यान यापूर्वी भाजप नेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी देखील गंगा्धर काळकुटे यांच्यावर आरोप केले होते, त्यानंतर आता अमोल खुणे यांनी देखील आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
