
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवकांचा बुधवारी बुडून मृत्यू झाला. सागर पोपट जेडगुले (वय 25 रा. धुळवड ता. सिन्नर) आणि अर्जुन रामदास जेडगुले (वय 18 रा. पेमगिरी, ता. संगमनेर) अशी त्यांची नावे आहेत. या मुलांच्या शोधासाठी एसडीआरएफचे जवान गुरुवारी सकाळी पोहचले होते. सकाळी त्यांनी मुलांच्या शोध सुरु केल्यानंतर त्यांची बोट बुडाली. या दुर्घटनेत तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जवानांचा शोध सुरु आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयात प्रवाशी बोट बुडाल्याची घटना घडली होती. त्यात पाच जणांचा मृत्यू झाला असतताना अहमदनगर जिल्ह्यात तीन जवान आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.
प्रवरा नदीत बुडालेल्या दोघांचा शोध एसडीआरएफ जवानांनी सुरु केला होता. परंतु धरणातून पाणी सोडलेले असल्यामुळे नदीच्या प्रवाहात पाण्याचा वेग प्रचंड होतो. यामुळे जवानांची बोट उडाली. यामध्ये तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. त्याचे मृतदेह मिळाले आहेत. तसेच दोघांचा शोध सुरु आहे. या बोटीत एसडीआरएफचे ४ जवान आणि १ स्थानिक नागरिक होता. अकोले तालुक्यातील सुगाव गावा जवळच ही घटना घडली आहे. जे जवान वाचवण्यासाठी आले, त्यांचाच मृत्यू झाल्याची घटना घडली.
घटनेची माहिती मिळाल्यावर माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात घटनास्थळी पोहचले. त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या. प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी दोन जणांच्या शोधासाठी सुरु असलेल्या प्रयत्नाची माहिती बाळासाहेब थोरात यांना दिली.
बुधवारी बुडलेल्या सागर पोपट जेडगुले याचा मृतदेह मिळाला आहे. परंतु अर्जुन रामदास जेडगूले याचा शोध अजूनही सुरु आहे.
SDRF जवानांची जी बोट बुडाली त्यात पीएसआय प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा, चालक वैभव सुनील वाघ यांचा मृत्यू झाला आहे. तसेच कॉन्स्टेबल पंकज पंढरीनाथ पवार आणि कॉन्स्टेबल अशोक हिम्मतराव पवार यांच्यावर उपचार सुरु आहे. बोटीत असणारा स्थानिक राहिवाशी गणेश मधुकर देशमुख याचा शोध सुरु आहे.
सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयात प्रवाशी बोट बुडाल्याची घटना बुधवारी घडली होती. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. या पाचही जणांचे मृतदेह मिळाले आहे. त्यात कृष्णा दत्तू जाधव (वय 28), कोमल कृष्णा जाधव (वय 25), वैभवी कृष्णा जाधव (वय 2.5), समर्थ कृष्णा जाधव (वय 1) आणि अनिकेत ज्ञानदेव अवघडे (वय 21 ) यांचा समावेश आहे. बुडालेल्यांमधील गौरव डोंगरे यांचा मृतदेह सर्वात शेवटी मिळाला. सर्व मृतदेह मिळाल्यानंतर शोधकार्य थांबवण्यात आले. करमाळा तालुक्यातील कुगाव उजनी जलाशयाच्या काठावर गौरव डोंगरे यांचा मृतदेह मिळाला.