दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांनी बोलवली बैठक; लवकरच…मोठी अपडेट समोर!
गेल्या अनेक दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. आता दोन्ही राष्ट्रवादीमध्ये मोठ्या हालचाली होत आहे. अजितदादा एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत.

लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मंराठी डिजिटल टीम : राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मुंबई, पुण्यासह राज्यातील एकूण 29 महापालिकांची निवडणूक होणार आहे. 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर केला जाईल. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही ठिकाणी युती आणि आघाड्यांचे नवे समीकरण जन्माला येत आहे. अनेक ठिकाणी महायुतीतील घटकपक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत. तर काही ठिकाणी भाजपा-शिंदे गट, भाजपा-राष्ट्रवादी अशी युती होताना पाहायला मिळत आहे. पुण्यात तर महायुतीचा भाग असलेले राष्ट्रवादी आणि भाजपा हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. मुंबईतही फक्त भाजपा आणि शिवसेना यांचीच युती होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी अजित पवार मोठं पाऊल उचलण्याची शक्यता. मिळालेल्या माहितीनुसार ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत युती करू शकतात. याबाबतच आता मोठी अपडेट समोर आली आहे.
नेमकी काय माहिती समोर आली आहे?
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने एकत्र यावे, अशी अपेक्षा पुण्यातील पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. याचाच आता अजित पवार विचार करणार आहेत. 17 डिसेंबर रोजी या मागणीवर विचार केला जाणार आहे. त्यासाठी मुंबईत विशेष बैठक होणार आहे. या बैठकीत खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनिल तटकरे हे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे की नाही, याबाबत या बैठकीत चर्चचा केली जाईल.
पिंपरी चिंचवडसाठी घेतल्या मुलाखती
मुंबईत होणाऱ्या या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत संपर्क साधला जाणार आहे. तत्पूर्वी अजित पवार आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आपल्या या दौऱ्यामध्ये त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निडणुकीत उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत भाग घेतला. आज एकूण 700 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यानंतर अजित पवार यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. आता लवकरच शरद पवार यांच्यासोबत युती करायची की नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
