रविकांत तुपकर यांच्या पत्नीची भावनिक फेसबूक पोस्ट; शर्वरी लिहितात, प्रिय रविकांत…

| Updated on: Feb 14, 2023 | 5:00 PM

आज परत उभी आहे मी कोर्टापुढे. तुझ्या आत्मदहन आंदोलनाची पार्श्वभूमी कोर्टाला समजवण्यासाठी. पोलिसांनी अमानुषपणे केलेला लाठीचार्ज कोर्टाला दाखविण्यासाठी.

रविकांत तुपकर यांच्या पत्नीची भावनिक फेसबूक पोस्ट; शर्वरी लिहितात, प्रिय रविकांत...
Follow us on

बुलढाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर हे न्यायालयीन कोठडीत आहेत. तुपकर यांनी आत्मदहन आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला. रविकांत तुपकर यांच्यासह २५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सरकारी कामात अडथडा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आज व्हॅलेंटाईन डे असल्यामुळं रविकांत यांच्या पत्नी अॅड. शर्वरी यांनी त्यांना भावनिक पत्र लिहिलं. या भावनिक पोस्टवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. यात त्या म्हणतात.
प्रिय रविकांत,

कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. पण तू चढलास. एकदाच नाही तर अनेकदा. वारंवार… कधी मुख्यमंत्र्यांची सभा उधळली म्हणून. कधी जिल्हा बँकेचे पीककर्जाचे रेकॉर्ड जाळले म्हणून. तर कधी स्वतःला जमिनीत गाडून घेतले म्हणून. किती किती म्हणून सांगू…

माझी धावपळ ठरलेली

व्यवस्थेशी अन्यायाशी तुझा कायमच संघर्ष आणि त्यातून मग पोलीस केस आणि कोठडीतला मुक्काम ठरलेला… मग माझी धावपळ ठरलेली. तू समजावून सांगितलेलं संघर्षाचं कारण कोर्टाला समजावून सांगण्याची. तुझी बाजू मांडून कायद्याच्या कचाट्यातून तुला सोडवून आणण्याची…

आधी सावजी आता तुपकर…

गेली १७-१८ वर्ष हे असचं सुरू आहे, बदल फक्त एकच. पूर्वीची ॲड. शर्वरी सावजी नंतर ॲड. शर्वरी रविकांत तुपकर झालेली. तुझ्या प्रत्येक आंदोलनातून तू कळत गेला आणि भावबंध कधी जुळले ते कळलचं नाही… पण तरीही तुझं ध्येय तुझ्यापुढे स्पष्ट होत आणि तुझा निर्धारही. अविरत संघर्ष करण्याचा. आणि माझा निर्धारही. तुला जेलमधून लवकरात लवकर बाहेर काढण्याचा…

 

घट्ट होताहेत भावबंध

आज परत उभी आहे मी कोर्टापुढे. तुझ्या आत्मदहन आंदोलनाची पार्श्वभूमी कोर्टाला समजवण्यासाठी. पोलिसांनी अमानुषपणे केलेला लाठीचार्ज कोर्टाला दाखविण्यासाठी. आणि परत एकदा तुला जेलमधून बाहेर काढण्यासाठी… असचं तर फुलतंय आपल्यातील प्रेम आणि अधिकाधिक घट्ट होतायेत आपल्यातील भावबंध… असाचं तर साजरा होत आलाय आपला व्हॅलेंटाईन. Happy valentine’s day dear…