
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याच्या चर्चा कायमच सुरु असते. त्यातच विधानसभा निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी शरद पवार गटात तर कधी शिवसेना ठाकरे गटात जाणार असल्याचे बोललं जातं. “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना”, असं सूचक वक्तव्य छगन भुजबळ यांनी केले होते. त्यातच आता उद्धव ठाकरे आणि छगन भुजबळ यांची भेट झाली. या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे.
सध्या विधानभवनात राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यावेळी अनेक मंत्री, विरोधक, सत्ताधारी हे सतत एकमेकांना भेटत असतात. त्यावेळी काहीना काही चर्चा होत असते. आताही ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची विधानभवनात भेट झाली. या भेटीनंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओत उद्धव ठाकरे छगन भुजबळांना काय म्हणाले, यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
या व्हिडीओत उद्धव ठाकरे विधानभवनाच्या लॉबीतून जाताना दिसत आहेत. त्याचवेळी समोरुन छगन भुजबळ येतात. उद्धव ठाकरेंना पाहताच छगन भुजबळ हे काही वेळ थांबले. त्यानंतर छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी तुम्ही चुकीच्या जागेवर उभं राहून जय महाराष्ट्र बोलताय..बोला… जय महाराष्ट्र बोलणं गरजेच, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान या आधी उद्धव ठाकरेंनी छगन भुजबळांच्या “जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना” या वाक्यावरही प्रतिक्रिया दिली होती. “या सरकारची झालीय दैना, त्यामुळे तिथे काही चैना, मैना, दैना काहीही होणार नाही. वहाँ नही रहैना हे मात्र त्यांचं अत्यंत योग्य आहे. छगन भुजबळ या विषयावर संपर्कात नाही. पण नेहमी संपर्कात असतात. सुधीर भाऊ मुनगंटीवार… बोलूया”, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.