नाशिकच्या जागेबाबत विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निघून गेले?; संकेत काय?

| Updated on: Apr 26, 2024 | 5:01 PM

आम्ही शेतकऱ्यांसाठी पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला. शेतकऱ्यांना 12 हजार रुपये वर्षाला मिळत आहेत. एक रुपयात पिक विमा देण्याचं काम सरकारने केलं आहे. आतापर्यंत 15 हजार कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. शासन आपल्या दारी उपक्रम राबवला. केंद्राने देखील कित्येक कामे केली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते मीडियाशी संवाद साधत होते.

नाशिकच्या जागेबाबत विचारताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निघून गेले?; संकेत काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

महायुतीने निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू केला असला तरी महायुतीत अजूनही सर्व काही अलबेल नाही. अनेक जागांवर अद्यापही महायुतीच्या नेत्यांनी निर्णय घेतलेला नाही. नाशिकच्या जागेचाही तिढा कायम आहे. शिंदे गटाची ही जागा असून या जागेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने दावा केला आहे. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनाही राष्ट्रवादीने ही जागा लढवावी असे वाटत आहे. त्यासाठी छगन भुजबळ यांचं नावही दिल्लीतून सूचवण्यात आलं होतं. पण भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतरही नाशिकचा तिढा काही सुटलेला नाही. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाशिकच्या जागेबाबत विचारण्यात आलं. त्यावर काहीही न बोलता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निघून गेले. त्यामुळे नाशिकमध्ये काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. पण नाशिकच्या प्रश्नावर बोलणं त्यांनी टाळलं. यावेळी त्यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधकांना फैलावर घेतलं. विरोधक इतर राज्यात जिंकतात तेव्हा ईव्हीएम बरोबर असतं. मात्र, जेव्हा हरतात तेव्हा ईव्हीएमवर आक्षेप घेतला जातो. विरोधकांची भूमिका दुटप्पी आहे. आता तर सुप्रीम कोर्टावर देखील आक्षेप घेतला जात आहे. यापूर्वीही सुप्रीम कोर्टाला सल्ले देत होते. न्यायालयाने आमची कोणतीही मागणी पूर्ण करावी अट्टाहास लोकशाहीला घातक आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

सुडबुद्धीने कारवाई करत नाही

मोदींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याचा निर्णय लोकांनी घेतलाय. लोक घरी बसणाऱ्यांना नाही तर काम करणारांना मतदान करतील. आम्ही सुडबुद्धीने कारवाई करत नाही. त्यांनी अनेक लोकांवर सूडबुद्धीने कारवाई केली. सरकार वाचवण्यासाठी आणखी काही लोकांना जेलमध्ये टाकणार होते, असा गौप्यस्फोटही मुख्यमंत्र्यांनी केला.

संजय राऊत पळपुटे

संजय राऊत सारख्या पळकुट्या लोकांना आमच्यावर बोलण्याचा अधिकार काय? एकनाथ शिंदे जे काही करतो ते खुलेपणाने करतो. जो निर्णय घेतो तो धाडसाने घेतो. मला कुठलीही भिती नाही. दबावापोटी नाही तर शिवसेना वाचवण्यासाठी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. खुर्ची मिळवण्यासाठी तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली. ये जनता है सब जानती है, असा हल्लाच त्यांनी राऊतांवर चढवला.

जोपर्यंत चंद्रसूर्य आहे…

काँग्रेसने गरीबी हटावचा नारा दिला. पण त्यांना गरीबी हटवता आली नाही. गरीब हटला. पण गरीबी गेली नाही. मोदी सरकारने पंतप्रधान आवास योजना गरीबांसाठी आणली. ती सर्व धर्मियांची आहे. मुस्लिमांना देखील या योजनेचा फायदा मिळाला. पण विरोधक केवळ व्होट बँकेचं राजकारण करत आहेत. संविधान बदलणार असल्याचा कांगावा करत आहेत. पण जोपर्यंत चंद्रसूर्य आहे, तोपर्यंत बाबासाहेबाचं संविधान कायम राहणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.