कर्जत वृक्षतोडीवर CM देवेंद्र फडणवीसांची फक्त 2 शब्दांत पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
भीमाशंकर अभयारण्यातील वृक्षतोड प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलंय? जाणून घेऊ...

कालपासून राज्यामध्ये कर्जतमधील टोरेंट कंपनी वृक्षतोडीवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. कर्जत आणि भीमाशंकर अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप करत विरोधकांनी आता मोर्चा काढण्याचीही तयारी केली आहे. त्यावरुन आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. फेक नरेटिव्हपेक्षा दुसरं काही याला म्हणता येणार नाही, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
कंपनीने जी जागा घेतली आहे. ती पाण्याच्या साठवणुकीसाठी घेतली आहे. जसं आपण धरण तयार करतो त्यासाठी ती जागा आहे. त्याच्या बदल्यामध्ये तीनपट जागा कंपनीने वनविभागाला दिली आहे. वनविभाग कंपनीच्या खर्चाने ३० हजार झाडं त्या साईटवर आणि ६० हजार झाडं या साईटवर अशी एकूण ९० हजार झाडं लावणार आहे. बरं सर्वात महत्त्वाचं हे आहे की, आपल्याला क्लीन पॉवर मिळाली नाही तर आपण कोळश्याची पॉवर घेऊ. तीन हजार मेगावॅट थर्मल पॉवर निर्माण करताना जे प्रदुषण तयार होतं ते संपवण्यासाठी २८ कोटी झाडं लावावी लागतील, हे सगळं करण्याची आवश्यकता नाही. कारण त्यासाठी आपण हा प्रोजेक्ट तयार करत आहोत. असं मुख्यंमत्र्यांनी म्हटलं आहे.
हा सगळा प्रोजेक्ट पर्यावरपूरक आहे. भीमाशंकर, जंगलापासून दूर आहे. भीमाशंकर मंदिरापासून २० किलोमीटर दूर आहे. सगळी गुंतवणूक राज्यात आहे, रोजगार राज्यात आहे आणि त्यावर पहिला अधिकारही महाराष्ट्राचा असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एवढे विकासाचे प्रोजेक्ट तयार होत आहेत. त्यासाठी क्लीन पॉवरची गरज राज्याला आहेच. प्रदुषण न करता तयार होणाऱ्या प्रोजेक्टला विरोध करण्याचं काही कारण नाही, त्यामुळे फेक नरेटिव्ह करुन राजकारण करायचं काम विरोधकांनी करु नये अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
दरम्यान, या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचा आरोप होत आहे. खलाटी, पोर्टल आणि भालिवडी या गावांच्या परिसरामध्ये जवळपास ९,५०० एकर क्षेत्रावर हा प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
