गडचिरोलीतील 12 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खास वस्तू दिली भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला केलेल्या भेटीमध्ये १२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण झाले. त्यांनी नक्षलविरोधी पथकाचा सत्कार केला आणि सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत रानटी हत्ती, वाघ आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर चर्चा झाली.

गडचिरोलीतील 12 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खास वस्तू दिली भेट
devendra fadnavis
| Updated on: Jun 06, 2025 | 5:35 PM

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली जिल्ह्याला भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी नक्षलग्रस्त भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच नक्षलविरोधी पथकातील जवानांचा सत्कार केला आणि अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. त्यांना मुख्यमंत्र्‍यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या.

नक्षलविरोधी पोलीस पथकातील जवानांचा सत्कार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुर्गम भागातील पोलीस ठाण्यांना भेट देऊन नक्षलविरोधी पोलीस पथकाच्या जवानांसोबत अभियानाची माहिती घेतली. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक मार्गावर नक्षलविरोधी पोलीस पथकाचे जवान तैनात होते. पोलीस अधीक्षक कार्यालय आणि कॉम्प्लेक्स भागात श्वान पथकांसह कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती.

गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नक्षलविरोधी पोलीस पथकातील जवानांचा सत्कार करण्यात आला. कवंडे पोलीस स्टेशन अंतर्गत झालेल्या चकमकीत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते. या नक्षलविरोधी पोलीस पथकाने केलेल्या यशस्वी कामगिरीबद्दल हा सत्कार करण्यात आला. यामध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. रमेश, विशाल नागरगुजे यांच्यासह १७ पोलीस जवानांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी एकलव्य हॉलमध्ये पोलीस जवानांना संबोधित केले. गेल्या तीन-चार वर्षांत नक्षल चळवळीला आळा घालण्यात नक्षलविरोधी पोलीस पथकाने मोठी यशस्वी कामगिरी केल्याचे कौतुक केले. गडचिरोली जिल्ह्यात आता फक्त चाळीस माओवादी उरले असून, माओवादी चळवळीला हादरा बसवण्याचे काम पोलीस जवानांनी केले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही कौतुक केले.

१२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण आणि विवाह सोहळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस मुख्यालयात १२ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये नक्षल चळवळीत डीव्हीसीएम (DVCM) पदावर कार्यरत असलेल्या अंजू आणि सरिता या दोन महिला माओवाद्यांनी एके-४७ (AK-47) रायफलसह आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना संविधान भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले.

आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचा लग्नसोहळा देखील पोलीस अधीक्षक कार्यालयात मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना मुख्यमंत्र्यांकडून भेटवस्तूही देण्यात आल्या. आत्मसमर्पण योजनेतून अनेक माओवाद्यांना नोकरी देण्याचे काम हे महाराष्ट्र राज्य सरकार आणि लॉइड मेटल कंपनी करत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला आमदार धर्मराव बाबा आत्राम, आमदार मिलिंद नरोटे, पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समितीची बैठक

यानंतर गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व अधिकारी आणि तीन आमदार उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा मुद्दा, वाघाची दहशत आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान अशा अनेक प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली.