Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाची घडामोड, मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली सरसंघचालकांची भेट, दोघांमध्ये काय चर्चा?
Devendra Fadnavis-Mohan Bhagwat Meet : महाराष्ट्राच्या राजकारणात आज महत्वपूर्ण घडामोड घडली. सध्या दिल्लीत रोज आंदोलनं सुरु आहेत. या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली.

नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूरमध्ये आहेत. नागपूरमध्ये आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आले. तिथे येऊन त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. मुख्यमंत्री फडणवीस आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात जवळपास 15 मिनिटं चर्चा झाली. दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली ते समजू शकत नाही. पण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. सध्या देशात आणि राज्यासमोर वेगवेगळे प्रश्न आहेत. राज्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे तर केंद्रात सरकारविरोधात कॉकरोच जनता पार्टी आणि काँग्रेसने आघाडी उघडली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी त्यांची रोज आंदोलनं सुरु आहेत.
निवडणूक आयोगातील मतभेद समोर आल्यापासून देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. दोन सह निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला होता. त्यांच्या सूचनांकडे केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. एका इंग्रजी वर्तमानपत्रात ही बातमी प्रसिद्ध झाल्यापासून विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. SIR च्या निवडणूक प्रक्रियेत गडबड असून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी विरोधी पक्षांची मागणी आहे.
कुठल्या मुद्यांवर चर्चा?
त्यामुळे देशातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना अटक करुन नंतर सर्शत जामिनावर सोडून देण्यात आलं. मागच्या आठवड्यापासून ते दिल्लीत आंदोलनं करत होते. काँग्रेस, सीजेपी आणि डावे पक्ष रस्त्यावर उतरले असून मोदी सरकारची कोंडी करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. देशात ही स्थिती असताना महाराष्ट्रातही भीषण दुष्काळाचे चटके जाणवत आहेत. पाऊस माघारी फिरला आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं नष्ट झाली आहेत. प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे या सर्व मुद्यांवर देवेंद्र फडणवीस आणि मोहन भागवत यांच्यामध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे.
