राहुल गांधी यांच्या वादग्रस्त विधानाला ठाकरे असहमत, काँग्रेसचे बडे नेते म्हणतात….

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यावर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने प्रतिक्रिया दिलीय.

राहुल गांधी यांच्या वादग्रस्त विधानाला ठाकरे असहमत, काँग्रेसचे बडे नेते म्हणतात....
| Edited By: | Updated on: Nov 17, 2022 | 6:05 PM

नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झालाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी आपण सहमत नसल्याचं स्पष्ट केलंय. पण महाराष्ट्रात असलेल्या महाविकास आघाडीत शिवसेनादेखील आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचं मिळून स्थापन झालेल्या महाविकास आघाडीचं राज्यात गेल्या तीन महिन्यांपूर्वी सरकार होतं. त्यामुळे राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंची भूमिका नेमकी काय आहे ते पाहणं महत्त्वाचं होतं. ठाकरेंनी राहुल गांधींच्या विधानाशी आपण सहमत नसल्याचं म्हटलंय. ठाकरेंच्या या भूमिकेवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना काय वाटतं हे देखील महत्त्वाचे आहे. याच मुद्द्यावर महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिलीय.

“ठीक आहे, त्यांचं मत त्यांनी मांडलं आहे. दोन्ही मतं जनतेच्या समोर आली पाहिजेत. त्यावर निर्णय झाला पाहिजे. राहुल गांधींच्या विरोधात काळे झेंडे दाखवणे ही लोकशाहीला विपरीत गोष्टी आहेत”, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर दिली.

राहुल गांधींच्या वादग्रस्त विधानावर राज्यभरातून भाजप, मनसे, शिंदे गटाकडून निषेध व्यक्त केला जातोय. यावरही बाळासाहेब थोरातांनी भूमिका मांडली.

“लोकशाही आहे, राहुल गांधी यांना आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यावर विरोध करणाऱ्यांनी प्रतिवाद करावा. राहुल गांधी यांनी मांडलेलं मत कसं चुकीचं आहे ते सांगावं”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

“काळे झेंडे दाखवणं, चाललेली पदयात्रा थांबवणं म्हणणं हा त्यावरचा उपाय या लोकशाहीत नाही. याउलट राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिवाद करुन त्यांनी सांगावं की, ही वस्तुस्थिती नाही”, अशी भूमिका बाळासाहेब थोरातांनी मांडली.

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी हिंगोलीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं.

“सावरकर हे इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसविरोधात सावरकर इंग्रजांसोबत काम करायचे”, असं विधान राहुल गांधींनी केलं.

“मैं आपका नौकर रहना चाहता हुं, असं पत्र सावकरांनी इंग्रजांना लिहिलं”, असा दावा राहुल गांधींनी केला. तसेच यावेळी राहुल गांधींनी पत्रही दाखवलं.