सावधान! XBB 1.16 वाढवतोय महाराष्ट्राच्या चिंता, कोरोनाच्या रुग्णांमध्ये दुप्पट वाढ

| Updated on: Mar 30, 2023 | 12:13 PM

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा एकदा राज्यात चिंता वाढवल्या आहेत. कारण रुग्णांमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. कोरोना वॉर्ड पुन्हा काही रुग्णालयांमध्ये सुरु केले जात आहेत. कोविड चाचण्या वाढवल्या गेल्या आहेत.

सावधान! XBB 1.16 वाढवतोय महाराष्ट्राच्या चिंता, कोरोनाच्या रुग्णांमध्ये दुप्पट वाढ
Follow us on

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात कोविड-19 रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासात रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. ज्यामुळे आता मुंबईतील आरोग्य अधिकारी सतर्क झाले आहेत. एकूण प्रकरणांपैकी 60% प्रकरणे हे रीकॉम्बिनंट सबवेरिएंट XBB 1. 16 चे परिणाम असल्याचे म्हटले जाते, टाइम्स ऑफ इंडियाने तज्ञांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. महाराष्ट्रात या नव्या व्हेरिएंटचे 230 रुग्ण आढळले आहेत. 230 पैकी 151 प्रकरणे ही पुण्यातील, 24 औरंगाबाद, 23 ठाण्यात, कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये प्रत्येकी 11, अमरावतीमध्ये 8 आणि मुंबई आणि रायगडमधील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे.

मंगळवारी महाराष्ट्रात 450 रुग्ण आढळली होती. 22 ऑक्टोबर नंतर ही सर्वाधिक रुग्ण संख्या होती. राज्यात 27 ऑक्टोबर 2022 रोजी 972 प्रकरणे आढळून आली होती. सध्या राज्यात जवळपास 2,500 सक्रिय प्रकरणे आहेत. पण यामध्ये रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे.

कोविड वॉर्ड पुन्हा सुरु

XBB 1. 16 हा व्हेरिएंट राज्यात सध्या चिंता वाढवत आहे. हा प्रकार आता 60% रुग्णांमध्ये आढळून आला आहे. बहुतेक रुग्णांना सौम्य लक्षणे दिसत आहेत. अहवालानुसार सेव्हनहिल्स रुग्णालयात सर्वाधिक कोविड रुग्ण आहेत. 53 रूग्णांपैकी 33 ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. मुंबईतील काही खासगी रुग्णालये कोविड-19 वॉर्ड पुन्हा सुरू करत आहेत. काही रुग्णालयांनी कोविड चाचणी वाढवली आहे. मास्क घालणं अनिवार्य केले आहे. वाढते COVID-19 प्रकरणं पाहता आरोग्य यंत्रण सतर्क झाले आहेत.

बुस्टर डोस घेण्याचे आवाहन

मुंबई, पुणे, ठाणे आणि सांगली यांसारख्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही कोविड प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. महाराष्ट्र सरकार कोविड लसीचा बूस्टर डोस घेण्याचं आव्हान करत आहेत. पण लोकांकडून त्याला प्रतिसाद कमी मिळत आहे. राज्यात 1 कोटी लोकांनी अद्याप बूस्टर डोस घेतलेला नाही.

14 कोविड रुग्णांचा मृत्यू

गेल्या 24 तासांत भारतात 3,016 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे, जी कालपासून 40 टक्क्यांनी वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार पॉझिटिव्हीटी रेट 2.7 टक्क्यावर गेला आहे. गुरुवारी झालेली वाढ ही जवळपास सहा महिन्यांतील सर्वाधिक वाढ आहे. गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी भारतात 3,375 प्रकरणे नोंदवली गेली होती. देशात 14 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 5,30,862 वर पोहोचली आहे.