Ashes 2025 : ऑस्ट्रेलियाला पराभूत करताच बेन स्टोक्सचा राग अनावर, अशा स्थितीवर व्यक्त केला संताप
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या इंग्लंडच्या पराभवाच्या मालिकेला खंड पडला आहे. एशेज मालिकेतील चौथा सामना जिंकून इंग्लंडने 14 वर्षानंतर विजयाची चव चाखली. पण या सामन्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाराजी व्यक्त केली आहे.

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या एशेज कसोटी मालिकेत इंग्लंडला सलग तीन सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे पाच सामन्यांची कसोटी मालिका गमवावी लागली. त्यानंतर उर्वरित दोन सामन्यातही अशीच स्थिती राहील असं क्रीडाप्रेमींना वाटत होतं. पण इंग्लंडने चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजलं. या विजयासह इंग्लंडने व्हाईटवॉशचं सावट दूर केलं आहे. आतापर्यंत झालेल्या चार सामन्यात 1-4 अशी स्थिती आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील विजयामुळे इंग्लंडच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पण या विजयानंतरही इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाराजी व्यक्त केली आहे. याचं कारण ठरलं ते गवताळ खेळपट्टी…
प्रत्येक वर्षी मेलबर्न क्रिकेट मैदानात बॉक्सिंग डे टेस्ट खेळली जाते. यावेळेसही 26 डिसेंबर रोजी कसोटी सामना सुरु झाला आणि 27 डिसेंबरला या सामन्याची सांगता झाली. अवघ्या दोन दिवसात हा सामना संपला. खरं तर हा सामना पाच दिवस चालणं अपेक्षित होतं. पण तसं झालं नाही. या सामन्यात एकूण 142 षटकं टाकली गेली आणि 36 विकेट पडल्या. कोणताही संघ 200 धावांपर्यंत मजल मारू शकला नाही. इतकंच काय तर अर्धशतकही ठोकता आलं नाही. हा सामना दोन दिवसात संपल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला. कारण या सामन्यातील सर्व थ्रिलच निघून गेला. कारण बॉक्सिंग डे कसोटी पाहण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षकवर्ग येतो. मात्र त्यांना दोन दिवसांचा खेळ पाहता आला.
“If that was somewhere else in the world, you know, there’d be hell on”
The captains share their opinions on the spicy MCG pitch 👀 #Ashes pic.twitter.com/XwhX3mexIB
— cricket.com.au (@cricketcomau) December 27, 2025
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने या विजयानंतर आनंद व्यक्त केला. पण आनंद व्यक्त करताना नाराजी देखील व्यक्त केली आहे. बेन स्टोक्सने सामन्यानंतर मीडियाशी बोलताना सांगितलं की, ‘प्रामाणिकपणे सांगायचं तर असं अजिबात आवडत नाही. बॉक्सिंग डे कसोटी सामना दोन दिवसात संपला. तुम्हाला असं आवडणार नाही. हा काही आदर्श नाही. पण एकदा का सामना सुरु झाला तर जे काही सामन्यात मांडून ठेवलं आहे ते खेळावं लागतं.’ स्टोक्सने यावेळी भारतासहीत दक्षिण आशियाई खेळपट्ट्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एमसीजीच्या खेळपट्टीचं उदाहरण देत सांगितलं की, “मला खात्री आहे की जर जगात इतरत्र असे घडले असते तर गोंधळ उडाला असता. पाच दिवस चालणाऱ्या सामन्यासाठी हे चांगले नाही. पण आम्ही असा खेळ खेळलो ज्याने काम पूर्ण केले.”
