
सध्या महाराष्ट्रात निवडणुकांचे वारे वाहत आहे. येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी राज्यात महापालिका निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. तर लगेच १६ जानेवारीला मतमोजणी केली जाणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाचा संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी काल रात्री एक बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत भाजपने शिवसेनेला ९० जागांचा प्रस्ताव दिला आहे. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेला १२५ जागा मिळाव्यात, यावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. या आग्रही भूमिकेमुळे महायुतीत पेच निर्माण झाला आहे.
एकनाथ शिंदे हे १२५ जागांसाठी आग्रही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबद्दल सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवर आपली पकड मजबूत करण्यासाठी आणि भविष्यात मुंबईच्या महापौरपदावर दावा सांगण्यासाठी शिवसेनेला किमान १२५ जागा लढवणे गरजेचे वाटत आहे. शिंदेंच्या या आक्रमक खेळीमुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. शिवसेनेच्या मते, ६० जागांवर त्यांचे निर्विवाद वर्चस्व आहे, तर इतर जागांवरही पक्षाची ताकद वाढली आहे.
तर दुसरीकडे भाजपने दिलेल्या ९० जागांच्या प्रस्तावात ३० जागा अशा आहेत जिथे मुस्लिम मतदारांचे वर्चस्व आहे. हे शिवसेनेवर दबाव टाकण्याचे तंत्र असल्याची चर्चा शिवसेनेत सुरू आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने १२५ जागांच्या मागणीवरून तसूभरही मागे न हटण्याचा निर्णय घेतल्याचे बोललं जात आहे
वर्षावरील दोन तासांच्या खलबतांनंतर आज सकाळी ११ वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी शिवसेना कोअर कमिटीची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत १२५ जागांच्या मागणीवर शिक्कामोर्तब करून त्यांनी भाजपला स्पष्ट निरोप दिला आहे.
एकीकडे जागावाटपाचा तिढा सुरू असताना, दुसरीकडे शिवसेनेने मुंबईत मोठे शक्तीप्रदर्शन सुरू केले आहे. राज्यभरातील विजयी नगराध्यक्ष आणि नगरसेवक मुंबईत दाखल झाले आहे. आज सायंकाळी वीर सावरकर स्मारकात त्यांचा सत्कार होणार आहे. त्यापूर्वी ते स्मृतीस्थळावर जाऊन वंदन करणार आहेत. या शक्तीप्रदर्शनाद्वारे शिवसेना आपली ताकद भाजपला दाखवून देण्याच्या तयारीत आहे.