कुणाल कामराविरोधात सरकारचा मोठा आदेश, देवेंद्र फडणवीस फटकारत म्हणाले “शिंदेंकडे बाळासाहेबांचा वारसा…”

देवेंद्र फडणवीस यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक टीकेचा तीव्र निषेध केला आहे. फडणवीसांनी कामराच्या वक्तव्याला "खालच्या दर्जाचे" आणि "सुपारीवर आधारित" असे संबोधले.

कुणाल कामराविरोधात सरकारचा मोठा आदेश, देवेंद्र फडणवीस फटकारत म्हणाले शिंदेंकडे बाळासाहेबांचा वारसा...
devendra fadnavis kunal kamra
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 24, 2025 | 2:36 PM

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टिप्पणी केली. यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराच्या वक्तव्याचा निषेध केला. महाराष्ट्राच्या जनतेने 2024 साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार, हे दाखवून दिले आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा वारसा कोणाकडे आणि तो वारसा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेला त्यांनी दिला, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात कुणाल कामरावरुन त्यांचे मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी विरोधकांरवर जोरदार निशाणा साधला. कुणाल कामराने आमच्यावर कविता करावी. राजकीय व्यंग करावं. आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ. पण अशाप्रकारे सुपारी घेऊन जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीसांचा कुणाल कामरावर जोरदार हल्ला

“अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे आपण लोक आहोत. पण हे स्वातंत्र्य जर स्वैराचाराकडे जात असेल तर मग ते मान्य होणार नाही. कुणाल कामराचा पूर्व इतिहास पाहिला तर देशातील उच्च पदस्थ लोकांच्या संदर्भात मग ते पंतप्रधान असो की मुख्य न्याय‍धीश असो किंवा न्यायव्यवस्था असो यांच्या संदर्भात खालच्या दर्जाचा बोलणं आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास राहणार नाही अशाप्रकारचं बोलणं ही याची कार्यपद्धती आहे”, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.

हा काय महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का?

“मुळात या व्यक्तीला कॉन्ट्रोवर्सी तयार करुन प्रसिद्धी मिळवण्याचा एक हव्यास आहे. या हव्यासातून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा त्याने प्रयत्न केला. खरंतर या कामराला हे माहिती पाहिजे की २०२४ च्या निवडणुकीने हे ठरवलं की कोण उद्दार आहे आणि कोण गद्दार आहे. हा काय महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का… महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलं की बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा वारसा कोणाकडे आणि तो वारसा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेला त्यांनी दिला”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“…तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल”

“तुमचे माझे राजकीय मतभेद असतील. पण राज्यातील एका नेत्याबद्दल ज्या नेत्याबद्दल जनतेला आदरभाव आहे, अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाला जाऊन कोणीतरी बोलतं आणि आमच्या समोरच्या बाकावरील लोकं त्याच्या समर्थनार्थ उभी राहतात. हे सर्व कामराशी ठरवून चाललेलं आहे की कामराला तुम्ही सुपारी दिली आहेत असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. जर त्याने संविधान वाचलं असतं तर त्याने अशाप्रकारचा स्वैराचार केला नसता. कुणाल कामराने आमच्यावर कविता करावी, राजकीय व्यंग करावं, आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ. पण अशाप्रकारे सुपारी घेऊन जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल”, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.