धनंजय मुंडेंचा आधी शनी शिंगणापुरात अभिषेक नंतर नगरमध्ये ‘वीरा’चं स्वागत !

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज (30 जानेवारी) सकाळी शनी शिंगणापुरच्या मंदीरात शनी देवाचा अभिषेक केला (Dhananjay Munde visit Shani Shingnapur Temple)

धनंजय मुंडेंचा आधी शनी शिंगणापुरात अभिषेक नंतर नगरमध्ये वीराचं स्वागत !
| Updated on: Jan 30, 2021 | 10:10 PM

अहमदनगर : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज (30 जानेवारी) सकाळी शनी शिंगणापुरच्या मंदीरात शनी देवाचा अभिषेक केला. करुणा शर्मा यांच्यासोबतचा लिव्ह इनचा वाद परस्पर सहमतीनं मिटवण्यासाठी एका मध्यस्थाची नेमणूक करण्यात आली आहे. तो वाद मिटेल अशी आशा केली जात असतानाच धनंजय मुंडे आज शनी शिंगणापुरात पोहोचले (Dhananjay Munde visit Shani Shingnapur Temple).

धनंजय मुंडेंमागची साडेसाती हटणार का?

शनी शिंगणापुरात शनी देवाला अभिषेक केल्यानंतर धनंजय मुंडेंमागची साडे साती संपलीय की संपावी म्हणून त्यांनी अभिषेक केला, याची जोरदार चर्चा रंगली आहे. पण धनंजय मुंडे एका मोठ्या राजकीय-सामाजिक संकटातून बाहेर पडत असल्याचं त्यांच्याच देहबोलीवरुन दिसत आहे. त्यातून पूर्ण मुक्त होण्यासाठीच ते शनी देवाच्या चरणी गेल्याचं दिसतं आहे.

नगरमध्ये धनंजय मुंडेंचं जोरदार स्वागत

आधी रेणू शर्मा यांनी केलेले गंभीर आरोप आणि त्यानंतर आता करुणा शर्मा यांच्यासोबत होत असलेली परस्पर सेटलमेंट या दोन्ही बाबी धनंजय मुंडेंसाठी सकारात्मक आहेत. त्यांच्या वैयक्तिक जीवनातलं मोठं वादळ शमताना दिसत असतानाच धनंजय मुंडे जिथं जातील तिथं त्यांचं जोरदार स्वागत होत आहे. आधी बीड आणि आज नगरमध्ये जिथंही मुंडे गेले तिथं त्यांचं एखाद्या युद्धावरुन विजयी होऊन परतलेल्या योद्ध्यासारखं स्वागत केलं गेलं. जेसीबीतून गुलालाची उधळण केली गेली. धनंजय मुंडे तुम आगे बढोच्या लोकांनी घोषणा दिल्या. फेटे बांधले गेले.

धनंजय मुंडेंना राजकीय फायदा होतोय?

शर्मा भगिनींच्या प्रकरणाचा धनंजय मुंडेंना सध्या तरी राजकीय फायदा होताना दिसतोय. शरद पवारांनी सुरुवातीला हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं होतं. पण कुठली पक्षीय कारवाई केली तर ओबीसी दुखावतील अशी भीती निर्माण होताच, राष्ट्रवादीनं मुंडेंवर कारवाई करणं टाळलं. त्यातच रेणू शर्मांनी तक्रार वापस घेतली. नंतर करुणा शर्मांसोबत सेटलमेंटसाठी मध्यस्थही तयार झाला आहे. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे स्वत:चा राजकीय खुट्टा बळकट करत असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा : उगीच नाही जगाचा पोशिंदा, माणसं तर जगवतोच पण पाखरांसाठीही ठेवतो, वाचा 81 वर्षाच्या आजीची भूतदया