
सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणी पोलिसांनी नवा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी कोणताही गैरप्रकार झालेला नाही. ती आत्महत्या होती, असे सांगत पोलिसांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना एकप्रकारे क्लीन चिट दिली आहे. या अहवालावर आदित्य ठाकरे यांनी भाष्य करण्यास नकार दिला. मात्र, भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी या मुद्द्यावर सातत्याने आरोप केले. आता यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नितेश राणेंवर जोरदार टीका केली आहे. यावेळी संजय राऊत यांनी नितेश राणेंनी नाक घासून माफी मागावी, अशी मागणी केली. आता यावरुन ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी नितेश राणेंवर बोचरी टीका केली आहे.
सध्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनादरम्यान आदित्य ठाकरे आणि नितेश राणे सभागृहाबाहेर आमनेसामने आले. यावेळी नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावेळी नितेश राणे लहान आवाजात “ये चला.. चला…” असे म्हणत आदित्य ठाकरेंची नक्कल करताना दिसत आहे. आता याला ठाकरे गटाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी, आणि आवाज कोंबडीसारखा किकीक करणारा…
असा हा ‘दिशाहीन’ जुहूचा निब्बर — ओळखा पाहू कोण? pic.twitter.com/q70MS7xZkk— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) July 3, 2025
ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी नुकतंच ट्वीटरवर एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी नितेश राणेंचं नाव न घेता त्यांना डिवचले आहे. “उंची पेंग्विनसारखी, चाल बदकासारखी, आणि आवाज कोंबडीसारखा किकीक करणारा… असा हा ‘दिशाहीन’ जुहूचा निब्बर — ओळखा पाहू कोण?” असे अखिल चित्रे यांनी म्हटले आहे.
दिशा सालियन प्रकरणात आलेल्या SIT अहवालानंतर जुहूचा निब्बर तोंडावर पडला आहे. शेवटी सत्याचाच विजय होणार, आदित्य साहेबांवर चिखल उडवणाऱ्याचं तोंड असंच रंगत राहील, तुम्ही कट कारस्थान रचत रहा,@AUThackeray महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत राहतील.
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) July 3, 2025
त्यासोबतच अखिल चित्रे यांनी एक ट्वीटही केले आहे. “दिशा सालियन प्रकरणात आलेल्या SIT अहवालानंतर जुहूचा निब्बर तोंडावर पडला आहे. शेवटी सत्याचाच विजय होणार, आदित्य साहेबांवर चिखल उडवणाऱ्याचं तोंड असंच रंगत राहील, तुम्ही कट कारस्थान रचत रहा, आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत राहतील”, असे अखिल चित्रे म्हणाले. दरम्यान या सर्व घडामोडींमुळे दिशा सालियन प्रकरण पुन्हा एकदा तापले असून, यावर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.