…म्हणून लोक त्यांना दादा म्हणायचे, अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी एकनाथ शिंदे भावुक, नेमकं काय म्हणाले?
पुणे जिल्हा परिषदेच्या आवारात आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते स्वर्गीय अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि प्रवेशद्वाराचे नामकरण करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते.

पुणे जिल्हा परिषदेच्या आवारात आज केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते स्वर्गीय अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि प्रवेशद्वाराचे नामकरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि खासदार सुप्रिया सुळे यांची देखील उपस्थिती होती. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवार यांचे कार्य एका पुतळ्याच्या चौकटीत मावणारे नाही. पुणे आणि बारामतीच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, दूरदृष्टी, प्रशासनावरील विलक्षण पकड आणि सर्वसामान्यांप्रती असलेली आत्मीयता महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. त्यांनी पाहिलेली विकासाची स्वप्ने आणि हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, अजितदादांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची वेळ आपल्यावर येईल, यावर आजही विश्वास बसत नाही. 28 जानेवारी हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरला. माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठा असलेला भाऊ गमावल्याचे दुःख मनात आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे.
विकासकामांची पाहणी करताना एखाद्या वास्तूतील वायर बाहेर आली आहे का, रंगकाम अपूर्ण आहे का, याकडेही अजितदादा बारकाईने लक्ष द्यायचे. प्रकल्पांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. प्रशासनावरील त्यांची पकड आणि क्षेत्रातील अभ्यास इतका विलक्षण होता की, वरिष्ठ सनदी अधिकारीही त्यांच्या प्रश्नांसमोर निरुत्तर होत असत. कठोर निर्णय घेणे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे ही त्यांची खासियत होती. विरोधी पक्षनेते असतानाही त्यांनी केवळ विरोधासाठी विरोध न करता विधायक सूचना केल्या. अधिवेशनात शेवटपर्यंत बसून काम करण्याची त्यांची वृत्ती अनुकरणीय होती.
योजनेच्या लाभार्थ्यांची कौटुंबिक परिस्थिती जाणून घेणारे, त्यांच्या अडचणी समजून घेणारे अजितदादा हे संवेदनशील नेतृत्व होते. स्पष्टवक्तेपणा आणि परखडपणासोबतच त्यांच्यात विलक्षण प्रेमळपणाही होता. त्यामुळेच लोक त्यांना गर्दीतून ‘दादा’ म्हणून हाक मारत असत.
मेट्रो, रिंगरोडसारख्या प्रकल्पांद्वारे पुण्याच्या वाहतूक कोंडीवर उपाय आणि बारामतीचा नियोजनबद्ध विकास करण्याचे त्यांचे व्हिजन होते. अर्थमंत्री म्हणून आर्थिक शिस्त पाळताना ‘आपले पांघरूण पाहून हातपाय पसरावेत’ हा त्यांचा स्पष्ट संदेश असायचा. ऊस उत्पादक, कांदा उत्पादक आणि सहकार क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. प्राप्तिकराच्या प्रश्नातून साखर कारखान्यांना दिलासा मिळवून देण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले, असंही यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.