एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात घोळ; वंदे मातरम् ऐवजी लागलं भलतंच गाणं, व्हिडिओ व्हायरल
एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात छोटासा घोळ झाल्याचे समोर आलं आहे. ठाण्यातील कार्यक्रमात वंदे मातरम् ऐवजी लागलं भलतंच गाणं लागल्याची घटना घडली.

ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील कार्यक्रमात एक छोटासा घोळ झाल्याचा प्रकार समोर आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रगीत वंदे मातरम् ऐवजी भलतच गीत वाजवल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्यासहित इतर मंत्री देखील उपस्थित होते. कार्यक्रमात भलतंच बॉलिवूडमधील वंदे मातरम् गाणं वाजलं. त्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्यासहित सर्व उपस्थितांनी बॉलिवूड गाण्यावेळी स्तब्ध राहून सन्मान दिला. बॉलिवूडमधील वंदे मातरम् गीत संपल्यानंतर राष्ट्रगीत जनगणमन सुरू झालं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वंदे मातरमऐवजी लागलं दुसरंच गाणं
ठाण्यात महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई मराठी साहित्य संघ, कोकण मराठी साहित्य परिषदेने एकत्र येऊन बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा पाठ्यक्रम अभियानाचा सांगता कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या कार्यक्रमात राष्ट्रगीत वंदे मातरमने होणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे सर्व जण उभे राहिले. वंदे मातरम गाणं सुरू केलं. परंतु अनिल कपूर, माधुरी दीक्षित यांच्या पुकार चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेले गाणे वाजलं. बॉलिवूडचं गाणं असूनही सर्वजण उभे राहिले. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक, मंत्री प्रताप सरनाईक देखील उपस्थित होते.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
खरंतर, पुरकार चित्रपटातील हे गाणं देखील एका जाहीर कार्यक्रमात रेकॉर्ड करण्यात आलं होतं. आता ठाण्यातील कार्यक्रमात हे गाणं वाजवल्यानंतर उपस्थितांनी हे गीत ऐकले आणि गायले. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गीताच्या काही ओळी गायल्याचे दिसून आले. आता या कार्यक्रमात घोळ कुणामुळे झाला, याचा चर्चा सुरू झाली आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये काहींना हा प्रकार लक्षात आले नसल्याचेही दिसत आहे. आता या प्रकारावरून संजय राऊत हे शिंदे गटावर काय टीका करतात, याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.