तुटलेल्या फरशा, खराब फ्रिज अन् अस्वच्छ… प्रसिद्ध कंपनीच्या कॅन्टीनचा अन्न परवाना निलंबित; FDA कडून व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश
Food Licence Suspended: वाळूजमधील Sodexo कॅन्टीनमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. तपासणीमध्ये 106 पैकी 44 गुण मिळाले आहेत. यानंतर कॅन्टीनला ‘नॉन-कम्प्लायन्स’ घोषित केले आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून एक बातमी समोर आली आहे. वाळूजमधील एका कंपनीच्या कॅन्टीनचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला आहे. आमदार प्रशांत बंब यांनी कॅन्टीनमधील अनियमिततेबाबत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अन्न आणि औषध प्रशासनाकडून कॅन्टीनची अचानक तपासणी झाली. या तपासणीत १०६ पैकी केवळ ४४ गुण दिले गेले. यानंतर कॅन्टीन ‘नॉन-कम्प्लायन्स’ घोषित केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील सोडेक्सो इंडिया सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या कॅन्टीनवर अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. गुडईयर साऊथ एशिया टायर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या आवारातील या कॅन्टीनचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. आमदार प्रशांत बंब यांनी कॅन्टीनमधील अनियमिततेबाबत तपासणीची मागणी केली होती.
त्यानंतर अन्न प्रशासनाने ३० सप्टेंबर रोजी कॅन्टीनची अचानक तपासणी केली. या तपासणीत कॅन्टीनला १०६ पैकी केवळ ४४ गुण मिळाले असून तपासणीचा अंतिम निष्कर्ष ‘नॉन-कम्प्लायन्स’ म्हणजेच नियमबाह्य असा नोंदवण्यात आला. अन्न तयार करण्याचे क्षेत्र, भाजीपाला कापण्याची जागा आणि जेवणाचे टेबल अस्वच्छ आढळले. जमिनीवरील फरशा तुटलेल्या होत्या, पाणी साचत होते आणि सांडपाण्याचे नालेही अस्वच्छ असल्याचे तपासणीत समोर आले.
तसेच अन्न साठवण्यासाठी वापरण्यात येणारा फ्रिज गंजलेला असून त्याचा दरवाजा तुटलेला होता. कच्चे आणि शिजवलेले तसेच शाकाहारी आणि मांसाहारी अन्न एकत्र ठेवण्यात आल्याने क्रॉस-कंटॅमिनेशनचा धोका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. परिसरात कोळ्याची जाळी आढळली असून कीड नियंत्रणाच्या नोंदीही उपलब्ध नव्हत्या. याशिवाय स्वयंपाकाच्या तेलाची गुणवत्ता तपासली जात नव्हती. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय आणि लसीकरण प्रमाणपत्रेही नियमानुसार नसल्याचे तपासणीत आढळले.
गरम आणि थंड अन्नासाठी आवश्यक तापमान नियंत्रणाच्या सुविधांचाही अभाव असल्याचे अहवालात नमूद आहे. या त्रुटींमुळे अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम ३२(३) अंतर्गत अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे. निलंबनाच्या काळात संबंधित कॅन्टीनने अन्न तयार करणे, प्रक्रिया, विक्री, वितरण आणि भोजन पुरवठ्यासह सर्व कॅटरिंग व्यवसाय तात्काळ बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व त्रुटी दूर करून त्याचा अनुपालन अहवाल पुराव्यांसह सादर केल्यानंतर फेरतपासणी केली जाणार आहे. त्यानंतरच अन्न परवाना पूर्ववत करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिली आहे.