संघाच्या कार्यालयात 1985 पर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नव्हता, संघ परिवारातील माजी आमदाराचा गौप्यस्फोट

"खरात जर दहा वर्षापासून हे उद्योग करत होता, तर मग गृह खात हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं, मग त्या ठिकाणचे आयुक्त यांना सस्पेंड का केलं जात नाही?" असा सवाल अनिल गोटे यांनी विचारला.

संघाच्या कार्यालयात 1985 पर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नव्हता, संघ परिवारातील माजी आमदाराचा गौप्यस्फोट
Anil Gote
| Updated on: Apr 27, 2026 | 2:06 PM

“मी गेल्या पन्नास वर्षापासून संघ परिवारात आहे. माझ्या आठवणीप्रमाणे संघाच्या कार्यालयात 1985 पर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्यात आलेला नव्हता” असा दावा माजी आमदार उबाठा गटाचे नेते अनिल गोटे यांनी केला आहे. ‘भाजपासाठी हिंदूंचा नेता म्हणजे महाराणा प्रताप’ असं अनिल गोटे म्हणाले. अनिल गोटे हे आता उद्धव ठाकरे शिवसेनेत असले तरी त्याआधी ते भाजपात होते. भाजपकडून त्यांनी आमदारकी भूषवली आहे. धुळे जिल्ह्यातील ते भाजपचे महत्वाचे नेते होते. आता मात्र ते सतत भाजपवर हल्ला बोल करतात. नुकतचं बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात एक वक्तव्य केलं. त्यावरुन आता मोठा वाद निर्माण झाला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना खूप थकले, म्हणजे त्यांना वाटलं की, आपण थकलो. एक दिवस ते रामदास स्वामी यांच्याकडे गेले. त्यांनी मुकूट उतारला आणि खाली ठेवला. आता आपल्याला युद्ध लढायचे नाही. हा मुकूट आपण सांभाळा, हा राजपाट आपण सांभाळा” असं धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले. नागपूरमध्ये भारदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी हे वक्तव्य केलं. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि संत मंडळी उपस्थित होती.

आसाराम बापूंना कोणी वाढवलं?

‘असेही भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांशी काही घेणं देणं नाही’ असं गोटे म्हणाले. “राजकीय आश्रयाशिवाय बुवा आणि बाबा वाढू शकत नाहीत. अशोक खरात आला, कोणी वाढवलं? राजकीय व्यक्तींनी आसाराम बापूंना कोणी वाढवलं? राजकीय व्यक्तींना कॅप्टन अशोक खरात प्रकरणाचा उपयोग राजकीय ब्लॅकमेलिंग शिवाय होत नाही” असं अनिल गोटे म्हणाले. “खरात जर दहा वर्षापासून हे उद्योग करत होता, तर मग गृह खात हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं, मग त्या ठिकाणचे आयुक्त यांना सस्पेंड का केलं जात नाही?” असा सवाल अनिल गोटे यांनी विचारला.

 

Follow Us