
चंदन पुजाधिकारी, नाशिक | 27 ऑक्टोंबर 2023 : नाशिक जिल्ह्यातील असलेल्या ललित पाटील याच्या ड्रग्स रॅकेट प्रकरणात एकामागेएक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. नाशिक ते पुणे असलेल्या कनेक्शनमध्ये तीन शहरातील पोलीस महत्वाची माहिती गोळा करत आहेत. मुंबई पोलिसांनी ललित पाटील याला अटक केल्यानंतर धक्कादायक खुलासे होत आहे. आता या प्रकरणात नाशिकमधील माजी महापौराचे नाव समोर आले आहे. विशेष म्हणजे हे व्यक्ती ठाकरे गटाचे आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये एकीकडे ठाकरे गटाकडून दादा भुसे यांचे नाव घेतले जात असताना ठाकरे गटातील माजी महापौर विनायक पांडे अडचणीत आले आहेत.
ललित पाटील ड्रग्स प्रकरण नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. ठाकरे गटाचे नेते असलेले माजी महापौर विनायक पांडे यांना पोलीस चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. ललित पाटील याची अपघातग्रस्त कार दुरुस्ती करण्यासाठी महापौर विनायक पांडे याच्या चालकाने त्याला मदत केल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. यामुळे या प्रकरणात पांडे यांची चौकशी होणार आहे. ललित पाटील बेवारस कार प्रकरण माजी महापौर विनायक पांडे यांना पोलिसांकडून चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. दुपारी २ वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात माहिती देण्यासाठी बोलवले आहे.
एकीकडे ललित पाटील प्रकरणात ठाकरे गट सातत्याने मंत्री दादा भुसे यांचे नाव घेत आहेत. त्याचवेळी ठाकरे गटाच्या नेत्याचे नाव चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणात नाव आल्यानंतर आपण कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे विनायक पांडे यांनी म्हटले आहे. आपणास राजकीय जीवनातून उठवण्याचा डाव असल्याचा आरोप विनायक पांडे यांनी केला आहे. यामुळे ही राजकीय चर्चा रंगणार आहे.
ललित पाटील प्रकरणात ठाकरे गटाच्या नेत्याचे नाव आल्यामुळे शिंदे गट आक्रमक होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत दादा भुसे यांना घेरण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होत होता. दादा भुसे यांनीच ललित पाटील याला शिवसेनेत आणल्याचे संजय राऊत यांंनी म्हटले होते. परंतु आता ठाकरे गटाचे नेतेच यामध्ये अडचणीत येत आहे.