माजी आमदाराच्या बहिणीचा अपघाती मृत्यू

  • अनिल किराळे, टीव्ही 9 मराठी, जळगाव
  • Published On - 20:37 PM, 12 May 2019
माजी आमदाराच्या बहिणीचा अपघाती मृत्यू

जळगाव : रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांची बहीण आणि काँग्रेसचे दिवंगत नेते मधुकर चौधरी यांची कन्या स्नेहजा रुपवते यांचं आज अपघाती निधन झालं. त्या 65 वर्षांच्या होत्या. मुंबईच्या दिशेने येत असताना जळगावच्या पाळधी फाट्याजवळ त्यांच्या कारचा टायर फुटल्याने हा भीषण अपघात झाला. स्नेहजा रुपवते यांच्या निधनाने रुपवते आणि चौधरी कुटुंबावर दु:खाचं डोंगर कोसळलं आहे.

रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या मुलीचं शनिवारी रावेर येथे लग्न होतं. हेच लग्न आटोपून स्नेहजा या मुंबईला परतत होत्या. भाचीचे लग्न आटोपल्यानंतर त्या काही नातेवाईकांसह मुंबईला परतत असताना पाळधी फाट्याजवळ भरधाव कारचा टायर फुटला. त्यानंतर त्यांची कार चारवेळा पलटली. या भीषण अपघातात स्नेहजा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर कारमधील चालकासह इतर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

स्नेहजा रुपवते कोण होत्या?

स्नेहजा रुपवते या विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांच्या कन्या होत्या. त्या दादासाहेब रुपवते यांच्या सून त्यासोबतच रावेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या बहीण होत्या. स्नेहजा या काँग्रेस नेते आणि बहुजन शिक्षण संघ संस्थेचे कार्यकारी विश्वस्त दिवंगत अ‍ॅड. प्रेमानंद रूपवते यांच्या पत्नी होत्या. स्नेहजा या वांद्रे येथील चेतना इन्स्टिट्यूटच्या संचालिकाही होत्या.