Vinayak Raut : विनायक राऊत यांचं सूनबाई गिरीजाला ओपन चॅलेंज, हिंमत असेल तर हे सांग की..
Vinayak Raut : माजी खासदार विनायक राऊत सध्या अडचणीत आले आहेत. त्यांच्या कुटुंबावर सूनबाई गिरीजा राऊतने गंभीर आरोप केले आहेत. आता विनायक राऊत सुद्धा आक्रमक झाले असून त्यांनी सूनबाई गिरीजाला ओपन चॅलेंज दिलं आहे.

घरच्या सूनेने शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे विनायक राऊत राजकीय दृष्ट्या अडचणीत आले आहेत. गिरीजा राऊतने काल पत्रकार परिषद घेऊन विनायक राऊत यांच्या कुटुंबावर अनेक आरोप केलेत. 2017 साली गिरीजाचं लग्न विनायक राऊत यांचा मुलगा गीतेशशी झालं. विनायक राऊत, त्यांचा मुलगा गीतेशने खोटं बोलून माझी आणि माझ्या कुटुंबाची फसवणूक केली. माझा मानसिक आणि भावनिक छळ केला. 2017 साली आमचं लग्न झालं. पण 2018 सप्टेंबरपर्यंत आमच्यात शारीरिक संबंध आले नाहीत, असा गौप्यस्फोट गिरीजा राऊतने केला. माझ्या बरोबर अघोरी कृत्य करण्यात आली. मला वेगवेगळ्या बाबा बुवांकडे नेलं. कोणी माझ्या अंगावरुन जिवंत कोंबडा उतरवला, कोणी मांसाचे तुकडे माझ्या अंगावरुन उतरवले. केस ओढले असे धक्कादायक दावे गिरीजा राऊतने केले.
या सर्व आरोपांना आज विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं. “आधी दोन बेडरूम मागितले. नंतर दोन कोटी रुपयावरून पाच कोटी मागितले. आता 10 कोटीची मागणी केली आहे. स्त्रीधन सासरी किती आणलं आणि जाताना किती घेऊन गेले हे हिंमत असेल तर सांगावं. तिला जे मिळालं ते तिचं नशीब. आम्हाला त्यात पडायचं नाही. जे मिळालं त्यात त्यांनी सुखी राहावं” असं विनायक राऊत म्हणाले.
अंजली दमानिया काय म्हणाल्या?
या प्रकरणात आता अंजली दमानिया यांची एन्ट्री झाली आहे. “व्यक्तीगत जिवनात ढवळाढवळ करण्याची इच्छा नाही पण त्यांच्या सुनेनं जे आरोप केलेत ते गंभीर असून याची चौकशी व्हायला हवी. दबाव कुणी टाकला, अघोरी प्रकार का केले ? जिवत कोंबडा, गोमुत्र प्यायला दिलं. असंख्य डॉक्टर्स केले, चूक मुलाची पण मुलाली टॉर्चर केलं , याची चौकशी व्हायला पाहिजे” अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली. “कुठल्याच गोष्टीचं गांभीर्य नाही, मविआला टोला लगावण्यापेक्षा या महिलेला न्याय द्यायला हवा. मुख्य मुद्दा हाच की महिला आयोगाच्या अध्यक्षाचा पत्ता नाहीये, त्यांना केवळ पद हवंय न्याय द्यायचा नाहीये, आपसातल्या भांडणाने महिला आयोगाचं अध्यक्ष पद रिक्त, हा गुन्हा आहे, सरकार टाईमपास करत आहे” असं अंजली दमानिया म्हणाल्या.