गिरीजा राऊतांचे गंभीर आरोप, आता प्रकरणात करुणा मुंडेंची एन्ट्री, विनायक राऊतांना केले तीन मोजके प्रश्न
विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यावर गिरीजा राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत, त्यामुळे राऊत कुटुंबीयाच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान यावर आता करुणा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यावर गिरीजा राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. गिरीजा राऊत या विनायक राऊत यांच्या सून आहेत. राऊत कुटुंबाकडून आपला मानसिक छळ करण्यात आला, असा आरोप गिरीजा राऊत यांनी केला आहे. मात्र दुसरीकडे विनायक राऊत यांनी गिरीजा राऊत यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या आरोपांमागे षडयंत्र आहे, त्याचा सूत्रधार कोण आहे, याचे पुरावे मी आज देणार नाही, परंतु माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता या प्रकरणात करुणा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रकरणावर बोलताना त्यांनी मोठी मागणी केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या करुणा मुंडे?
प्रत्येक पुढारी तांत्रिक, मांत्रिकाच्या नादी लागलेले असतात. त्यांच्या सुनेला न्याय भेटला पाहिजे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. विनायक राऊत यांनी म्हटलं की तिने पैशांची मागणी केली, परंतु तुम्ही त्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं आहे. श्रीमंत लोकांना काय वाटतं? की महिलांचं आयुष्य फक्त असच असतं? काय विचार करून तुम्ही लग्न करता? असा थेट सवाल यावेळी करुणा मुंडे यांनी केला आहे.
तुम्ही माफी मागण्यापेक्षा सांगतात की लोन भरण्यासाठी पैशांची मागणी केली, मग याच्यामध्ये काय चूक आहे? आज मंत्रिमंडळामध्ये बसलेल्या एका एका आमदार, खासदारांना दोन -दोन तीन-तीन बायका आहेत, पण त्यावर कोणी बोलणार नाही. महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त आहे, तिथे कोणीतरी बसवा, नाहीतर मला महिला आयोगाचे अध्यक्ष करा, मग मी बघा महिलांना कसा न्याय देते ते असंही यावेळी करुणा मुंडे यांनी म्हटलं आहे. पुढाऱ्यांमध्ये अंधश्रद्धा असते, एक खासदार, आमदार, नगरसेवक असा नाहीये, ज्याचा संबंध हा भोंदू बाबासोबत नाही. विनायक राऊत यांच्या सूनेला मी भेटणार आहे, असंही यावेळी करुणा मुंडे म्हणाल्या. दरम्यान सध्या राज्यासह देशात खासदार, आमदार फुटत आहेत, यावर देखील करुणा मुंडे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. यावरून त्यांनी सरकारला टोला लगावला आहे.