वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; दरात होणार मोठी कपात

वीज ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे, वीज दरात मोठी कपात होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; दरात होणार मोठी कपात
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 25, 2025 | 9:29 PM

वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे, आता लवकरच त्यांची महागड्या वीजेपासून सुटका होणार आहे. वीजदरात कपात करण्यात येणार असून, लवकरच वीज ग्राहकांना स्वस्थ वीज मिळणार आहे. पहिल्या वर्षी दहा टक्के आणि टप्प्याटप्प्यानं पुढील पाच वर्षांमध्ये वीज दरामध्ये तब्बल 26 टक्के कपात करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस?  

‘राज्याच्या इतिहासात प्रथमच पहिल्यावर्षी 10 टक्के आणि टप्प्याटप्प्याने कपात करीत 5 वर्षांत 26 टक्के वीजदर कमी होणार आहेत. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने (एमईआरसी) हा निकाल महावितरणच्या याचिकेवर दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. साधारणत: पूर्वीचा काळ पाहिला तर 10 टक्के वीजदरवाढीच्या याचिका सादर व्हायच्या. पण, राज्याच्या इतिहासात प्रथमच महावितरणने वीजदर कमी करण्यासाठी याचिका केली. त्यावरच हा आदेश एमईआरसीने दिला.

या आदेशाचा लाभ घरगुती ग्राहक, औद्योगिक ग्राहक आणि व्यावसायिक ग्राहक अशा तिन्ही वर्गवारीत होणार आहे. राज्यात 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणार्‍यांचे प्रमाण हे 70 टक्के आहे. त्यांच्यासाठी 10 टक्के इतके सर्वाधिक दर कमी होतील. आमच्या बळीराजाला दिवसा आणि खात्रीचा वीजपुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 चे काम युद्धपातळीवर सुरु आहे. सोबतच आगामी काळात वीजखरेदी करारांमध्ये हरितऊर्जेवर मोठ्या प्रमाणात भर दिल्यामुळे वीजखरेदी खर्चात बचत होणार आहे. त्यामुळेच हा दर कमी करण्याचा प्रस्ताव महावितरणला मांडता आला. ही बातमी राज्यातील जनतेला देताना मला आनंद होतो आहे.’ असं फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

कोणाला होणार फायदा? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार आता राज्यामध्ये वीज दरामध्ये कपात केली जाणार आहे. पहिल्या वर्षी दहा टक्के तर पुढील पाच वर्षांमध्ये टप्प्या टप्प्याने वीज दरामध्ये 26 टक्के कपात केली जाणार आहे. राज्यात 100 युनिटपेक्षा कमी ज्यांचा वीज वापर असेल अशा लोकांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे.