गोविंद फाउंडेशनचा नेदरलँडच्या राजदूताकडून PUM इम्पॅक्ट अवॉर्ड 2025 ने सन्मान

फलटण : जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण शेतकरी महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील असलेल्या गोविंद फाउंडेशनला नेदरलँडच्या भारतीय राजदूत एच. ई. मारिसा जेरार्ड्स यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी PUM इम्पॅक्ट अवॉर्ड 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे.

गोविंद फाउंडेशनचा नेदरलँडच्या राजदूताकडून PUM इम्पॅक्ट अवॉर्ड 2025 ने सन्मान
Govind Foundation
Image Credit source: Google
| Updated on: Mar 10, 2026 | 5:28 PM

10 डिसेंबर 2025 रोजी नेदरलँड्स मध्ये एच. ई. राणी मॅक्सिमा यांच्या उपस्थितीत झालेल्या PUM इम्पॅक्ट अवॉर्ड्स सोहळ्यात 6 विजेत्यांपैकी एक गोविंद फाउंडेशनच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. नवी दिल्लीतील समारंभाद्वारे भारतातील गोविंद फाउंडेशनच्या टीमला अधिकृतपणे हा पुरस्कार गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स आणि नेदरलँड्स दूतावासातील मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. महिला दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि भारतातील दुग्ध क्षेत्रातील लघु आणि मध्यम उद्योगांना (SMEs) बळकटी देण्यासाठी गोविंद फौंडेशनने दिलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल हा गौरव करण्यात आला आहे.

गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस फलटणचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे विजयसिंह नाईक निंबाळकर व गोविंदच्या संचालिका श्रीमंत सौ. शिवांजलीराजे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी हा सन्मान स्वीकारला, त्यावेळी नेदरलँड्स दूतावासातील कृषी सल्लागार सुश्री मॅरियन व्हॅन शाईक, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टस फलटणचे मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मेंद्र भल्ला, श्रीमंत अजयसिंह नाईक निंबाळकर गोविंद फौंडेशनचे महाव्यवस्थापक डॉ. शांताराम गायकवाड, PUM भारत प्रतिनिधी डॉ. तरन्नुम कादरभाई, PUM प्रतिनिधी NCR पुनीत रमण उपस्थित होते.

राजदूत जेरार्ड्स यांनी गोविंद टीमचे स्वागत केले आणि दुग्ध क्षेत्रातील महिला उद्योजकांना सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. त्या म्हणाल्या, गोविंद फौंडेशनचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. दिवसाला केवळ 128 लिटर दुधापासून सुरु झालेला हा प्रवास आज दररोज 7 लाख लिटरपर्यंत पोहोचला आहे, जे त्यांच्या दूरदृष्टीचे आणि चिकाटीचे प्रतीक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, फाउंडेशनने 22 हजाराहून अधिक महिला दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना सन्मान आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिले आहे. उद्योजकता समुदायांमध्ये कसा बदल घडवून आणू शकते, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. पुरस्कारा सोबत, राजदूत जेरार्ड्स यांनी गोविंद टीमला ‘डेल्फ्ट ब्लू ट्युलिप फूलदाणी’ आणि स्वतः लावलेल्या गुलाबी ट्युलिप फुलांचा गुच्छ भेट दिला, जो भारत आणि नेदरलँड्समधील मजबुत सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक आहे.

गोविंदच्यावतीने आपल्या भावना व्यक्त करताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले म्हणाले, आमचा प्रवास 1995 मध्ये दररोज अवघ्या 128 लिटर दूध संकलनाने सुरु झाला होता, आज आम्ही 7 लाख लिटरच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत आणि आमचे ध्येय 10 लाख लिटरचा टप्पा ओलांडण्याचे आहे. ही प्रगती केवळ हजारो महिला दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या समर्पणामुळेच शक्य झाली आहे, ज्या आमच्या या संपूर्ण व्यवस्थेचा कणा आहेत.

दुग्ध व्यवसाय करताना जनावरांचे शेण काढणे, जनावरे स्वच्छ धुणे, त्यांना चारा पाणी घालणे या कामासाठी लागणारा वेळ व श्रम कमी करुन महिलांना आपल्या व्यवसायाकडे अधिक लक्ष देता यावे या उद्देशाने मुक्त संचार गोठा, उत्तम व सकस चारा नियोजनासाठी मुरघास आणि चांगली वंशावळ निर्मितीसाठी तांत्रिक मदत गोविंद फौंडेशन मार्फत उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे निदर्शनास आणून देत अशा महिलांना गोविंद फौंडेशन पंजाब, कर्नाटक व इतर राज्यातही अभ्यास दौऱ्यावर पाठवते त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचे स्पष्ट करताना आज हजारो महिला स्वतःच्या पायावर उभ्या असून त्यांनी 2 गाईपासून 50 गाईंचे गोठे तयार केले आहेत. त्या ट्रॅक्टर चालवण्यापर्यंत सर्व कामे स्वतः करत असल्याचे गोविंदच्या संचालिका श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

PUM च्या भारत प्रतिनिधी डॉ. तरन्नुम कादरभाई यांनी गोविंद फौंडेशनला पाठिंबा देण्यामध्ये PUM तज्ज्ञांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. PUM ने गोविंद फौंडेशनमधील सुधारणेसाठी 8 महत्त्वाच्या क्षेत्रांवर काम केले. चौघा PUM तज्ज्ञांनी महिला दुग्ध उद्योजकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि संस्थेची कार्यप्रणाली मजबूत करण्यासाठी जवळून काम केले. या उपक्रमांतर्गत 10 गावांतील 100 महिला उद्योजकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, आता त्या ‘मास्टर ट्रेनर’ म्हणून काम करण्यास सज्ज आहेत. त्या आपल्या समुदायातील इतर अनेक महिलांना हे ज्ञान आणि कौशल्ये देतील.

PUM इम्पॅक्ट अवॉर्ड अशा संस्थांना दिला जातो ज्या PUM तज्ज्ञांच्या सहकार्याने मोजता येण्याजोगा आणि शाश्वत प्रभाव निर्माण करतात. महिला सक्षमीकरण, ग्रामीण उपजीविका मजबूत करणे आणि दुग्ध क्षेत्राचा विकास करण्यातील गोविंद फौंडेशनचे कार्य हे शाश्वत विकासाचे एक शक्तिशाली उदाहरण असल्याचे डॉ. तरन्नुम कादरभाई यांनी आवर्जून सांगितले.

Follow Us