महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांसाठी अभय योजना, लाभ कुणाला? वाचा सविस्तर

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांसाठी अभय योजना, लाभ कुणाला? वाचा सविस्तर
Gulabrao patil

पाणीपट्टीच्या (Water supply) मुळ मुद्दलावरील विलंब आकार/शुल्क माफीच्या सवलतीची अभय योजना (Abhay Yojna) जाहीर झाली असून ही योजना आजपासून राज्यात लागू करण्यात आली आहे, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 21, 2022 | 4:50 PM

मुंबई : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता पाणीपट्टीच्या (Water supply) मुळ मुद्दलावरील विलंब आकार/शुल्क माफीच्या सवलतीची अभय योजना (Abhay Yojna) जाहीर झाली असून ही योजना आजपासून राज्यात लागू करण्यात आली आहे, अशी माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली. याबाबतचे शासन परिपत्रकही पाणी पुरवठा विभागाकडून निर्गमित करण्यात आले आहे. पाणी पुरवठा मंत्री पाटील म्हणाले, राज्यात आजपासून अभय योजनेला सुरुवात होत आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांकरिता पाणीपट्टीच्या मुळ मुद्दलावरील विलंबाचा आकार, दंड, व्याज यात पाणीपुरवठा विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सूट देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी टप्प्या-टप्प्याने पैसे भरावे. पर्यटनस्थळ असलेल्या माथेरान पाणीपुरवठा केंद्राच्या मागणीच्या आधारावर ही योजना आजपासून संपूर्ण राज्यात सुरु झाली आहे.

प्राधिकरणाला नवसंजीवनी मिळण्यास मदत

या योजनेच्या माध्यमातून तोट्यात असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला नवसंजीवनी मिळण्यास मदत होणार आहे. त्याकरिता सर्व ग्राहकांनी पाणीपट्टीची थकबाकी असलेली मुद्दल रक्कम भरून या योजनेच्या सवलतींचा लाभ घ्यावा. ग्राहकांना सुरळित पाणीपुरवठा होण्याकरिता त्यांनी या योजनेचा लाभ घेऊन अभय योजनेत सामील व्हावे, असे आवाहन पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी केले.

919 कोटींची थकबाकी : ग्राहकांना प्रोत्साहनाकरिता अभय योजना

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे कोकण 5, नागपूर 10, पुणे 14, नाशिक 7 व अमरावती 15 अशा एकूण 51 पाणीपुरवठा केंद्रांकडे 31 मार्च 2020 अखेर पाणीपट्टीची एकूण मुद्दल रु. 516 कोटी व विलंब आकार रु. 403 कोटी अशी एकूण रु. 919 कोटी रूपये थकबाकी असून याबद्दल सातत्याने प्रयत्न करूनही हया थकबाकीच्या स्थितीत सुधारणा न झाल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या 148 व्या बैठकीत वसुलीसाठी प्रोत्साहनात्मक अशी अभय योजना प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानुषंगाने पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या दि. 12 जानेवारी 2022 च्या शासन पत्रान्वये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांना प्रोत्साहन मिळणेकरिता विलंब आकार सवलतीची अभय योजना लागू करण्याच्या प्रस्तावास वित्त विभागाने मान्यता दिली असून याबाबतचे शासन परिपत्रकही पाणी पुरवठा विभागाकडून निर्गमित करण्यात आले आहे. ही योजना राज्यातील 51 पाणी पुरवठा केंद्रासाठी लागू राहणार आहे.

अभय योजना कोणासाठी व कशी ?

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ग्राहक त्यांचेकडील किरकोळ पाणी पुरवठा व ठोक पाणी पुरवठ्याची मुळ पाणीपट्टीची रक्कम पूर्णत: भरतील त्यांना विलंब आकारात सवलत देण्यात येईल.

1.नोंदणीच्या दिनांकापासून पहिल्या तिमाहीत पूर्ण थकबाकी रक्कमा भरल्यास योजना सुरू होण्याच्या दिनांकास देय असलेली विलंब आकाराची संपूर्ण रक्कम 100 टक्के विलंब आकार माफ होईल.
2.नोंदणीच्या दिनांकापासून दुस-या तिमाही अखेर पूर्ण थकबाकी रक्कम भरल्यास योजना सुरू होण्याच्या दिनांकास देय विलंब आकार रक्कमेच्या 90 टक्के विलंब आकार माफ होईल व उर्वरित 10 टक्के रक्कम ग्राहकांना भरावयाची आहे.
3. नोंदणीच्या दिनांकापासून तिस-या तिमाही अखेर पूर्ण थकबाकी रक्कम भरल्यास योजना सुरू होण्याच्या दिनांकास देय विलंब आकार रक्कमेच्या 80 टक्के विलंब आकार माफ होईल. व उर्वरित 20 टक्के रक्कम ग्राहकांना भरावयाची आहे.
4. नोंदणीच्या दिनांकापासून चौथ्या तिमाहीअखेर पूर्ण थकबाकी रक्कम भरल्यास योजना सुरू होण्याच्या दिनांकास देय विलंब आकार रक्कमेच्या 70 टक्के विलंब आकार माफ होईल. व उर्वरित 10 टक्के रक्कम ग्राहकांना भरावयाची आहे.

अभय योजनेची ठळक वैशिष्ट्ये :

1. योजनेत सहभागी होणा-या म.जी.प्रा. ग्राहकांनी ही योजना जाहीर केल्याच्या दिनांकापासुन एक महिन्याच्या आत योजनेत सहभागी होण्याबाबत आपले नांव प्राधिकरणाच्या संबंधित कार्यकारी अभियंता कार्यालयाकडे तशा आशयाच्या (योजनेत अटी-शर्ती मान्य व योजनेत किती कालावधीत भरणा करणार यासह) ठरावासह नोंदवावे.
2. ही योजना जाहीर झाल्याच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ग्राहकांनी प्राधिकरणाच्या संबंधित कार्यालयाच्या लेख्यांशी ताळमेळ घालून आपल्याकडील पाणी व विलंब आकाराची आकडेवारी अंतीम करून घ्यावी. तशी पूर्तता स्थानिक स्वराज्य संस्थेने न केल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या लेख्यानुसार या बद्दलची येणे रक्कम अंतिम राहील. योजना सुरू हाण्यापूर्वीच्या कालावधीबाबत कोणत्याही प्रकारे सवलत देय राहणार नाही.
3. योजना प्रारंभ दिनांकापर्यंत असलेली थकबाकी अंतिम करून त्या दिनांकास योजनेत सहभाग घेणा-या म.जी. प्रा. ग्राहकांची विलंब आकाराची रक्कम गोठविण्यात येईल.
4. एकदा या योजनेत प्रविष्ट झाल्यावर या योजनेतून बाहेर पडता येणार नाही. तसे करावयाचे झाल्यास ताळमेळाप्रमाणे निश्चित झालेली सर्व रक्कम वसूल पात्र राहील व विलंब आकार गोठविण्याची कार्यवाही निरस्त होऊन विलंब आकाराची रक्कम पूर्ववत लागू राहील.
5. मध्येच या योजनेतून बाहेर पडल्यास अथवा योजनेप्रमाणे थकीत रक्कमेचा भरणा न केल्यास विलंब आकार न गोठविता, पूर्ण थकबाकी भरणे बंधनकारक राहील. तसेच विलंब आकार नेहमीप्रमाणे चालू राहील. योजनेप्रमाणे कोणतीही सूट अनुज्ञेय राहणार नाही.
6. योजनेमध्ये विहित केल्यानुसार योजना सुरू होण्यापूर्वी निर्णय घेऊनच प्रत्येक म.जी.प्रा. ग्राहकांना या योजनेत प्रविष्ट होता येईल. योजना लागू झाल्यानंतर या योजनेत प्रविष्ट होता येणार नाही.
7. योजनेत प्रविष्ट होणा-या म.जी.प्रा. ग्राहकांना विहीत कालावधीत मूळ पाणी बिलाची थकबाकी व माफीस पात्र नसलेला विलंब आकार (हे समान हप्त्यात भरणे) बंधनकारक राहील.
8. ज्या कालावधीत योजनेप्रमाणे थकबाकी भरण्याचा पर्याय म.जी.प्रा. ग्राहक योजनेत प्रविष्ट होताना निवडतील त्यानूसार त्यांना विलंब आकार अनुज्ञेय होईल. मात्र प्रत्येक तिमाहीत एकूण देय रक्कम (पाणीपट्टी व देय विलंब आकार) ही समान हप्त्यात भरावी लागेल. जसे दोन तिमाहीत थकबाकी भरणा करण्याचे स्विकारले असेल तर प्रत्येक तिमाही एकूण देय रक्कमेच्या 1/2 रक्कम (मूळ पाणीपट्टी/व 10% विलंब आकार) भरणे आवश्यक राहील जर प्रथम निवडलेल्या पाणीपट्टी व विलंब आकार थकबाकी अदाईचा कालावधी काहीही कारणाने पाळणे शक्य झाले नाही, तर ज्या तिमाहीत शेवटचा हप्ता (मात्र योजनेप्रमाणे विहित मुदतीच्या आत) भरतील त्या तिमाहीनुसार जो एकूण कालावधी (थकबाकी अदाईचा) येईल त्यानुसार विलंब आकारात योजनेप्रमाणे अनुज्ञेय सवलत मिळेल.
9. ही योजना फक्त एक वर्षासाठीच मर्यादित आहे. त्यात कोणत्याही परिस्थितीत वाढ होणार नाही.
10. या योजनेच्या अंमलबजावणी संबंधात काही विवाद उत्पन्न झाल्यास त्याबाबतचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिवांचा निर्णय हा सर्व पक्षावर बंधनकारक राहील.

मान्यताप्राप्त जलसंपदा प्रकल्पांच्या निविदा मर्यादेत वाढ करणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Chandiwal Commission : चांदीवाल आयोग अनिल देशमुखांच्या उलटतपासणीबाबत लवकरच आपला अहवाल सादर करणार

Maharashtra Corona, Omicron Update : सावधान! पुन्हा चिंता वाढली, आज पुन्हा 46 हजार पार, गाफिलपणा नडेल!

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें