Jalgaon Bank Election : जळगाव बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट, ठाकरेंच्या उमेदवारामुळेच गुलाबराव पाटील बिनविरोध, नेमकं काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. गुलाबराव पाटील यांच्या विरोधातील भाजपच्या दोन आणि शिवसेना ठाकरे गटाच्या एका उमेदवाराने माघार घेतली आहे.

Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या निवडणुकीत भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन तसेच शिंदे गटाचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील हे स्वत: उभे असल्याने नेमकं काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान गिरीश महाजन यांची या निवडणुकीत बिनविरोध निवड झाली. त्यानंतर आता गुलाबराव पाटील हेदेखील या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षानेच या निवडणुकीतून माघार घेतल्याने गुलाबराव पाटील यांचा विजय सुकर झाला.
जळगाव बँकेच्या निवडणुकीत काय घडलं?
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. गुलाबराव पाटील यांच्या विरोधातील भाजपच्या दोन आणि शिवसेना ठाकरे गटाच्या एका उमेदवाराने माघार घेतली आहे. भाजपच्या जयश्री महाजन, प्रभाकर सोनवणे आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील या तीन उमेदवारांनी माघार घेतली आहे. जळगाव सोसायटी मतदारसंघातून मंत्री गुलाबराव पाटील यांची बिनविरोध निवड झाली असून ते पहिल्यांदाच जिल्हा बँकेची निवडणूक लढत आहेत. गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक लढवणाऱ्या ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्ष कुलभूषण पाटील यांच्या माघारीने राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आतापर्यंत तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत
शिवसेना शिंदे गटाचे सुमित पाटील यांची बिनविरोध निवड
दुसरीकडे याच निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपचे सतीश शिंदे यांनी माघार घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचे सुमित पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांनी पाचोरा विकास सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढवली. सुमित पाटील हे पहिल्यांदाच जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक लढत असून त्यांचीही बिनविरोध निवड झाली. भाजपचे सतीश शिंदे यांनी अर्जावर आक्षेप घेतल्याने सुमित पाटील यांचा अर्ज बाद झाला होता, राजकीय दबावामुळे अर्ज बाद झाल्याचा सुमित पाटील यांनी आरोप केला होता. सुमित पाटील यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील केल्यावर सुनावणी झाल्यावर अर्ज पुन्हा वैध ठरला आहे. आता त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सोनल पवार यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची पत्नी सोनल पवार यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटलांचे चिरंजीव प्रतापराव पाटील आणि भाजपच्या गायत्री पाटलांची माघार घेतल्याने सोनल पवार यांची बिनविरोध निवड झाली. धरणगाव विकास सोसायटी मतदारसंघातून सोनल पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.