Amitabh Bachchan : माझी बोट उलटली अन्…थोडक्यात बचावलेले अमिताभ बच्चन, सांगितला धक्कादायक प्रसंग
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपत' मध्ये एक धक्कादायक प्रसंग सांगितला आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आपल्या दमदार अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या ते ‘कौन बनेगा करोडपती 18’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. या कार्यक्रमाच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात त्यांनी आपल्या आयुष्यातील एक थरारक अनुभव सांगितला. नेपाळमध्ये चित्रपटाचं शूटिंग करत असताना कयाकिंगचा आनंद घेणं त्यांना चांगलंच महागात पडलं होतं. या साहसी खेळादरम्यान त्यांची बोट उलटली आणि ते पाण्यात बुडता बुडता वाचले होते.
अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीविषयक कारणांमुळे काही काळ ‘कौन बनेगा करोडपती 18’चे जुने भाग प्रसारित केले जात होते. मात्र, सोमवारी नव्या स्पर्धकांसह कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. याच भागात एका स्पर्धकाशी संवाद साधताना अमिताभ यांनी नेपाळमधील हा धक्कादायक अनुभव सांगितला.
अमिताभ बच्चन एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी नेपाळमध्ये गेले होते. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं त्यांना कयाकिंग करण्याचा सल्ला दिला. हा अनुभव अतिशय सुंदर असल्याचंही त्यांना सांगण्यात आलं. सुरुवातीला मात्र अमिताभ यांनी कयाकिंग करण्यास नकार दिला होता. कारण कयाक ही बोट अतिशय अरुंद असल्यामुळे त्यात बसणंसुद्धा त्यांच्यासाठी कठीण ठरत होतं. त्यांना या बोटीत व्यवस्थित बसण्यासाठी जवळपास 45 मिनिटे प्रयत्न करावे लागले. अखेर त्यांनी कयाकिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यावेळी ते बुडाले होते आणि त्यांचा जीव थोडक्यात वाचला.
अमिताभ बच्चन यांनी सांगितला प्रसंग
अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘कयाकिंग करताना योग्य दिशेनं पॅडल मारणं आवश्यक असतं. मला बोट एका दिशेनं वळवायची होती, पण मी ती दुसऱ्याच दिशेनं वळवली आणि बोट उलटली. अशा वेळी पाण्याखाली असताना हात वरच्या दिशेने ढकलले, तर बोट पुन्हा सरळ होईल, असं मला आधी सांगण्यात आलं होतं. तरीही बोट सरळ झाली नाही, तर दोन्ही हात पाण्याखाली जोरजोरात हलवायचे, जेणेकरून आजूबाजूच्या लोकांना कोणीतरी बुडत असल्याचं लक्षात येईल. त्यामुळे मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत पाण्याखाली दोन्ही हात जोरजोरात हलवत होतो. कारण माणूस फार वेळ श्वास रोखून धरू शकत नाही.’
