
नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या वतीनं तपोवनातील काही झाडं तोडण्यात येणार आहेत, मात्र या वृक्षतोडीला विविध संघटना आणि पर्यावरण प्रेमींकडून विरोध होत आहे. ही झाडं आम्ही तोडू देणार नाही अशी भूमिका या संघटनांनी घेतली आहे. विशेष म्हणजे या वृक्षतोडीला आता हिंदू संघटनांकडून देखील विरोध केला जात आहे. महापालिकेच्या वतीने ज्या -ज्या वृक्षावर फूली मारण्यात आली होती, आता त्या झाडांवर हिंदू संघटनांच्या वतीने जय श्रीराम, जय हनुमान असं लिहिण्यात आलं असून, त्या झाडांना शेंदूर देखील लावण्यात आला आहे. तपोवन येथील वक्षतोडीच्या निर्णयाविरोधात हिंदू संघटना देखील चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान सध्या तपोवन येथील वृक्षतोडीचा मुद्दा राज्यभर गाजत असतानाच आता या आंदोलनात ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी देखील उडी घेतली आहे, त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांची पाठराखन करत अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
कुंभमेळ्यासाठी नाशिक येथील तपोवनातील काही झाडं तोडण्यात येणार आहेत, मात्र त्यासाठी विविध संघटनांकडून विरोध होत आहे. या आंदोलनाला प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील आपला पाठिंबा जाहीर केला आहे. एकही झाडं तोडू देणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी या पार्श्वभूमीवर बोलताना कुंभमेळ्यात येणाऱ्या साधूंबद्दल देखील वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. दरम्यान त्यावरून आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सयाजी शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे, तसेच त्यांनी यावेळी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांचं कौतुक देखील केलं आहे.
नेमकं काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
तपोवन हे साधूंसाठी आहे, त्यामुळे एक कलाकार म्हणून यामध्ये अडथळा निर्माण करणं हे योग्य नाही. असे आले किती आणि गेले किती, सयाजी शिंदे यांनी चिंतन करावं, त्यांनी केवळ स्क्रिप्ट वाचू नये, जास्त टर-टर करू नये, स्क्रिप्टवर जगणं सोडा, कुणाचं तरी ऐकून जगणं सोडा, असा घणाघात गुणरत्न सदावर्ते यांनी सयाजी शिंदे यांच्यावर केला आहे, तसेच त्यांनी यावेळी गिरीश महाज यांचं देखील कौतुक केलं आहे. गिरीश महाजान यांची गॅरंटी आहे की एकही झाड तुटणार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.