ब्राह्मणांनी काय पाप केलं? जरांगेंवर टीका करताना सदावर्ते काय म्हणाले?
Gunaratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या मागणीवर भाष्य केलं आहे. तसेच गरीब ब्राम्हण समाजावरही भाष्य केले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी अनेक आंदोलने केली आहेत. सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा केली असली तरी अनेक मराठा बांधवांना मिळालेली प्रमाणपत्र रद्द केली जात आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली आहे. अशातच आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटलांच्या आरक्षणाच्या मागणीवर भाष्य केलं आहे, तसेच त्यांनी ब्राम्हण समाजावरही स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
खुल्या वर्गातील जातीत आरक्षणावर गदा येत आहे – सदावर्ते
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, ‘झेंड्यासोबत जाती असतात, गुणवंत विद्यार्थी संघटना लोप पावत चालल्या आहेत. विद्यार्थी हे पाकिस्तानी, बांगलादेशी नाहीत. खुल्या वर्गातील जातीत आरक्षणावर गदा येताना दिसत आहे. 6 ऑगस्टला जो निर्णय देण्यात आला त्यावर उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती यांनी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की 10 टक्के जागा रिक्त ठेवण्यात याव्यात. मला कोणावर व्यक्तिगत टीका करायची नाही पण सत्ता देऊन आरक्षण दिलं जात आहे. पूर्वी मराठा आरक्षण संदर्भात कायदा होता की, एक व्यक्ती एकाच प्रवर्गात आरक्षण घेऊ शकतात.’
ब्राह्मण गरीब असणं हा गुन्हा आहे का?
पुढे बोलताना सदावर्ते यांनी म्हटले की, मला मराठा समाजाचा द्वेष नाही, पण काही लोक समाजाला वेगळीकडे घेऊन जात आहेत. जरांगे कितवी पास आहे हे मला माहीत नाही. ब्राह्मण गरीब असणं हा गुन्हा आहे का? हे थेटच बोलतो. त्या समाजाला आरक्षण नाही.
जरांगेंना आरक्षणाची बाराखडी माहित नाही – सदावर्ते
पुढे बोलताना सदावर्ते यांनी म्हटले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे आयुक्त क्लिन माणुस आहे. मनोज जरांगे त्यांच्यावर आगपाखड करेल त्यांनी चिंता करु नये. जरांगेंना आरक्षणाची बाराखडी माहित नाही. जरांगेंना कोणीतरी स्क्रिप्ट पुरवत आहे. जरांगेमुळे किती लोक अडचणीत आले आहेत ते मला वेगळं सांगायची गरज नाही. इथल्या पीडब्ल्यूडीच्या इंजिनियरचा राजीनामा सुद्धा जरांगेमुळे झाला असा आरोपही सदावर्तेंनी केला.