गुहागरमध्ये मुसळधार पावसाने अनेक गावांचा संपर्क तुटला, नदीला पूर

गुहागरमध्ये आज सकाळापासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाचा अनेक नागरिकांना फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक घरात पाणी शिरलं आहे.

गुहागरमध्ये मुसळधार पावसाने अनेक गावांचा संपर्क तुटला, नदीला पूर
| Updated on: Jul 08, 2024 | 9:43 PM

गुहागरमध्ये पोमेंडी गावातील नदीला पूर आला आहे. त्यामुळे दोन वाड्यांशी संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसाचा फटका गावातील स्वयंभू सोमेश्वर मंदिराला बसला आहे. पहिल्यांदाच मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरले आहे. गुहागरमध्ये आज सकाळ पासूनच मुसळधार पाऊस सुरु असून नागरिकांची चांगलीच तारांबळ उद्याली आहे. नवा नगर, धोपावे भागात पाणी घरात शिरले आहे. आरे येथील पुलावरून पाणी जात आहे. त्यामुळे पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे गावांशी संपर्क तुटला आहे.

मुख्य बाजारपेठ शृंगार तळी मध्ये ही अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. गुहागरमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय. घरामध्ये पाणी शिरल्यामुळे दहा जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 23 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. दिवसभरात आज गुहागरमध्ये 123 मिलिमीटर पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे गुहागरमधील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

आरे पुलावरुन पाणी वाहत असल्याने गुहागरचा पलीकडील गावांशी संपर्क तुटलाय. रात्री दहा वाजताची समुद्राला भरती येणार आहे. त्यामुळे यावेळेत देखील घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. गुहागर तहसिलदारांनी तशी माहिती दिली आहे. तालुक्यातल्या परिस्थितीवर प्रशासनाची नजर आहे. पावसाचा जोर कमी झाला असल्याने घाबरून जाऊ नका असे आवाहन करण्यात आले आहे. गुहागर मधील रेकॉर्ड ब्रेक पावसाचा परिणाम सर्वच गांवावर दिसत आहे. ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क देखील तुटला आहे. वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे.

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. नागरिकांना काम नसेल तर घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे.