बायकोला ‘सेकंड हँड’ म्हणणं पतीला भलतचं महागात पडलं ! आता द्यावी लागणार 3 कोटींची भरपाई,कोर्टाचे आदेश

| Updated on: Mar 27, 2024 | 12:06 PM

नवरा-बायकोच्या नात्यात भांडणं होणं हे कॉमन असतं. पती-पत्नीमध्ये वाद तर होतच असतात, पण थोड्याच वेळात हे भांडण मिटतं आणि नवरा-बायको पुन्हा गुण्या-गोविंदाने राहू लागतात. मात्र काही वेळा भांडणादरम्यान असे काही शब्द बोलले जातात जे मनाला लागतात, शब्दांनी झालेली जखम पटकन बरी होत नाही आणि प्रकरण वाढतं.

बायकोला सेकंड हँड म्हणणं पतीला भलतचं महागात पडलं ! आता द्यावी लागणार 3 कोटींची भरपाई,कोर्टाचे आदेश
Follow us on

नवरा-बायकोच्या नात्यात भांडणं होणं हे कॉमन असतं. पती-पत्नीमध्ये वाद तर होतच असतात, पण थोड्याच वेळात हे भांडण मिटतं आणि नवरा-बायको पुन्हा गुण्या-गोविंदाने राहू लागतात. मात्र काही वेळा भांडणादरम्यान असे काही शब्द बोलले जातात जे मनाला लागतात, शब्दांनी झालेली जखम पटकन बरी होत नाही आणि प्रकरण वाढतं. अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामध्ये पत्नीला रागात काही बोलणं पतीला खूप महागात पडलं आहे. खरंतर या प्रकरणातील नवऱ्याने पत्नीला ‘सेकंड हँड’ म्हटलं होतं, मात्र ते त्याच्याच अंगावर शेकलं. बायकोला ‘सेकंड हँड’ म्हटल्याने नवऱ्याला आता तिला तब्बल 3 कोटीं रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे. एवढंच नव्हे तर तिला दर महिन्याला खर्चासाठी 1.5 लाख रुपयेही द्यावे लागणार आहेत. न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण ?

या प्रकरणातील पीडितेच्या सांगण्यानुसार, त्या दोघांचं 1994 मध्ये लग्न झालं. दोघेही हनिमूनसाठी नेपाळला गेले होते. यावेळी तिच्या पतीने तिला ‘सेकंड हँड’ म्हटले. वास्तविक, पीडितेचं याआधी लग्न ठरलं होतं, साखरपुडाही झाला होता, मात्र काही कारणाने तो मोडला. नंतर पीडितेचं लग्न झालं. लग्नानंतर दोघेही पती-पत्नी अमेरिकेला गेले. त्यांनी अमेरिकेत लग्नसोहळाही आयोजित केला होता. काही दिवसांनी आरोपी पतीने पीडितेला मारहाण करण्यास सुरुवात केली. तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन खोटे आरोप करू लागला. दरम्यान, पती-पत्नी दोघेही 2005 मध्ये मुंबईत परतले आणि संयुक्त मालकीच्या घरात राहू लागले. 2008 साली पीडिता ही आईसोबत राहण्यासाठी तिच्या माहेरी गेली. तर 2014 साली नवरा पुन्हा अमेरिकेला परतला.

महिलेने घेतली कोर्टात धाव

त्यानंतर निराश होऊन पीडितेने 2017 मध्ये मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत तक्रार दाखल केली. पीडितेने केलेल्या आरोपांना तिची आई, भाऊ आणि काका यांनीही दुजोरा दिला. पीडित महिला ही घरगुती हिंसाचाराची बळी ठरल्याचे न्यायालयाने मान्य केले. जानेवारी 2023 मध्ये न्यायालयाने आरोपी पतीला 3 कोटी रुपये नुकसानभरपाई, दादरमध्ये घर शोधण्यासाठी, पर्यायाने घरासाठी 75 हजार रुपये आणि दरमहा दीड लाख रुपये देखभाल भत्ता देण्याचे निर्देश दिले.

पतीने घेतली उच्च न्यायालयात धाव

ट्रायल कोर्टाच्या या आदेशाविरोधात आरोपी पतीने हायकोर्टात फेरविचार याचिका दाखल केली होती. आता मुंबई उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा तो आदेश कायम ठेवला आहे. त्यानुसार, त्या इसमाला, त्याच्या पत्नीला तीन कोटी रुपयांची भरपाई आणि दीड लाख रुपयांची पोटगी देण्याचे निर्देश देण्यात आले. ही रक्कम महिलेला केवळ शारीरिक दुखापतीसाठीच नव्हे तर मानसिक छळ आणि भावनिक त्रासाची भरपाई म्हणून देण्यात आली आहे, असे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांनी आदेशात म्हटले. घरगुती हिंसाचारामुळे पत्नीच्या स्वाभिमानावर परिणाम झाला, असेही नमूद करण्यात आले.