
महाराष्ट्रात मागच्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. या निवडणुकांचा कार्यक्रम आता सुरु झाला आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतीनंतर आता महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. कालच राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली. महाराष्ट्रातल्या एकूण 29 महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पक्षांतराला वेग येणार आहे. सांगली जिल्ह्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत मिळाले आहेत.
सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मिरजेतील माजी महापौरासह 12 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची वाट धरली आहे.मिरजेतील काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गट, जनसुराज्य व भाजपच्या माजी नगरसेवकांनी काल सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली आहे.
पक्ष प्रवेश कधी होणार?
यावेळी पक्षप्रवेशावर चर्चा झाली असून लवकरच मिरजेत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आहे.काँग्रेसचे माजी महापौर किशोर जामदार,करण जामदार,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान आरिफ चौधरी,चंद्रकांत हुलवान,नर्गिस सय्यद,आजम काजी, भाजपाचे शिवाजी दुर्वे यांच्यासह जनसुराज्यशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असून 19 डिसेंबर रोजी या सर्वांचा मिरजेत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा व जनसुराज्य शक्ती पक्षाला निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे गटाला धक्का
सांगली जिल्ह्याप्रमाणे महाराष्ट्राच्या अन्य भागातही अशाच प्रकारच चित्र दिसण्याची शक्यता आहे. काल उद्धव ठाकरे गटाच्या विश्वासू मानल्या जाणाऱ्या तेजस्वी घोसाळकर यांनी भाजपची वाट धरली. मुंबईत उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे बंधुंसाठी प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची लढाई आहे.