Daulat Maharaj Satpute: रात्री गावात कीर्तन करून मठात परतले, सकाळी अनर्थ घडला; कीर्तनकार दौलत महाराजांनी आयुष्य संपवलं
Daulat Maharaj Satpute Found Dead: कीर्तनातून समाजप्रबोधन करणाऱ्या महाराजांनी टोकाचं पाऊल उचललं आहे. मठात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत.

जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथे ह.भ.प. दौलत सातपुते महाराज (वय 41) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रात्री गावात कीर्तन करून मठात परतलेल्या महाराजांचा दुसऱ्या दिवशी सकाळी मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दौलत महाराज सातपुते हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील रहिवासी होते. मागील आठ ते दहा वर्षांपासून ते जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अवघडराव सावंगी येथे वास्तव्यास होते. गावातील पाताळेश्वर मंदिर परिसरातील मठात त्यांनी आपले वास्तव्य केले होते. कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून ते धार्मिक विचारांचा प्रसार करण्यासोबतच समाजप्रबोधनाचे कार्य करत होते. त्यांच्या कीर्तनातून अनेक विषयांवर भाष्य केले जात होते. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि भाविकांशी त्यांचा नियमित संपर्क होता.
घटनेच्या आदल्या दिवशी रात्री दहा वाजेपर्यंत त्यांचे अवघडराव सावंगी गावात कीर्तन झाले होते. त्यानंतर ते नेहमीप्रमाणे मठात परतले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी बराच वेळ होऊनही ते खोलीबाहेर आले नाहीत. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना संशय आला. त्यांनी खोलीचा दरवाजा उघडून पाहिले असता दौलत महाराज गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पारध पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दौलत महाराज यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणामुळे उचलले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून तपासानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. रात्री गावात कीर्तन करून भाविकांना मार्गदर्शन करणारे दौलत महाराज दुसऱ्याच दिवशी सकाळी मठात मृतावस्थेत आढळल्याने या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. त्यांच्या मृत्यूमुळे अवघडराव सावंगी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.