Manoj Jarange: काळीज पिळवटणारी घटना, आंदोलनस्थळीच मराठा आंदोलकाचा मृत्यू, अंतरवाली सराटीत शोककळा

Maratha Protester Dies Antarwali Sarati: मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. दरम्यान अंतरवाली सराटीत एका आंदोलकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. हा आंदोलक बीडच्या धारूर तालुक्यातील असल्याचे समजते. या घटनेमुळे एकच शोककळा पसरली आहे.

Manoj Jarange: काळीज पिळवटणारी घटना, आंदोलनस्थळीच मराठा आंदोलकाचा मृत्यू, अंतरवाली सराटीत शोककळा
मराठा आंदोलक, मनोज जरांगे पाटील
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Sep 03, 2026 | 9:30 AM

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 6 वा दिवस आहे. अंतरवाली सराटीत जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून समर्थक आले आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या मराठा आंदोलकाचा अंतरवाली सराटीत मृत्यू झाला आहे. दशरथ रायकर असे आंदोलकाचे नाव आहे. ते बीड जिल्ह्यातील धारुर या तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने आंदोलनस्थळी आणि मराठा आंदोलकांमध्ये एकच शोककळा पसरली आहे.

दशरथ रायकर यांचा मृत्यू

दशरथ रायकर असं या मराठा आंदोलकाचं नाव असून ते बीडच्या धारूर तालुक्यातील संगम येथील रहिवासी आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दशरथ रायकर हे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीत आले होते. रात्री उशिरा ते अंतरवाली येथील एका शेतात झोपले होते मात्र ते सकाळी झोपेतून उठत नसल्याने त्यांना अंबड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आहे. यामुळे आंदोलनस्थळी शोककळा पसरली आहे.

टायर जाळत आंदोलक आक्रमक

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातही बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे. माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव या गावात बंद ठेवत मराठा बांधवांनी रस्त्यावर उतरून टायर जाळले. तर सरकारचा आम्ही निषेध करतो, जोपर्यंत जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत चक्का चालु देणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला.

बीड जिल्हा बंदची हाक‌

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून त्यांच्या समर्थनार्थ बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या बाजारपेठा सकाळपासूनच बंद असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. बंद दरम्यान काही ठिकाणी आंदोलने होण्याची शक्यता आहे. बीड पोलिसांचा तगडा बंदोबस्त, AI CCTV surveillance व्हॅन तैनात तर सीसीटीव्हीच्या माध्यमातून संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर बीड पोलिसांच्या सुट्ट्या मंजूर झालेल्या नाहीत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us